मुंबई,दि१४( punetoday9news):- भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी उद्योजक असलेल्या जनार्दन भोईर यांनी हौसेखातर चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. या हेलिकॉप्टरसाठी भोईर यांनी शेतातच हॅलीपॅड उभारले आहे. भोईर यांच्या या हेलिकॉप्टरची चर्चा आता जिल्ह्यात पसरली आहे.
भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या भागात स्थानिकांची आर्थिक प्रगती चांगलीच झाल्याने ग्रामीण भागात अलिशान कार दारोदारी पहायला मिळतात.
यात मर्सिडीझ, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु, रेंजरोव्हर, एमजी हेक्टर या कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीवर गोदाम उभारले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. यातून त्यांना प्रचंड पैसा मिळाला. यातूनचं जनार्दन भोईर यांचे व्यवसायानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील लोकांशी संपर्क येऊ लागला. यातूनच या नव्या व्यवसायाचे धाडस त्यांनी केले. स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावे लागते तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी घरी सर्व सुखसुविधा असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed