पिंपरी,दि.२३ (punetoday9news ):- शिवजन्मोत्सवानिमित्त सायकलवारी गडकोटांवरी मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते . १९ फेब्रुवारी २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हि मोहीम घेण्यात आली. यामध्ये जुन्नर तालुक्यातील तीन गडकोट आणि कुकडेश्वर मंदिर असा तब्बल ३२५ किमी चा सायकल प्रवास करण्यात आला.
या प्रवासात अतिशय प्रतिकुल परिस्थितींना तोंड देत हा प्रवास पूर्ण केला. कधी सायकल टायर पंक्चर तर कधी चेन तुटणे तर कधी अवकाळी पाऊस तर कधी उलट्या दिशेने येणारे बोचरे वारे या सर्व अडचणींवर मात करुन आपली सायकलवारी गडकोटांवरी मोहीमेची सांगता शिवनेरी किल्ल्यावर झाली. या मोहिमेत अंतर्गत कुकडेश्वर, प्रसन्नगड (३४०० फूट) जीवधन (३७५७ फूट) शिवनेरी (२९००फूट) या गडकोटांना भेट देण्यात आली.
मोहीमेत गड संवर्धन, गडांवरील पाणी नियोजन, अंधश्रद्धा निर्मूलन, सर्वधर्मसमभाव, जातीभेद न पाळणे अशा विषयांवर संदेश देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे विषय स्वतः कसे हाताळले याविषयी जागरुकता करण्याचे काम केले. तसेच हे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची समरगीते, पोवाडे, यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण वारी ही सायकल वरच पूर्ण झाली कोणतेही बाह्य साह्य न घेता ही वारी चिखली पिंपरी येथील क्रिडाशिक्षक केशव अरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
तसेच यामध्ये कोथरुड येथील अप कमिंग सोल्जर अकादमी चे मंगेश भालेराव, आकाश बोंद्रे, निखील मेणे, तन्मय सोलकर या तरुणांनी सहभाग घेतला. जवळपास ३२५कि.मी. संपूर्ण डोंगराळ भागातील सायकल प्रवास केला. या वारीचे आणखी एक विशेष म्हणजे ही वारी फक्त गडांच्या पायथ्यापर्यंत न जाता पायथ्याशी सायकल लावून तेथून पुढे पायी गड सर केला जातो. अशा पद्धतीने गडकोटांवर प्रवास करणारे सायकलस्वार खूपच कमी आहेत. आतापर्यंत केशव अरगडे यांनी २७ गडकोटांवर सायकलवारी गडकोटांवरी मोहीमेच्या माध्यमातून प्रवास केला आहे.
Comments are closed