पिंपरी,दि.२५( punetoday9news):- चाकण परिसरातून अपहरण झालेल्या चिमुकलीचा शोध पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतला खरा पण आता त्या चिमुकलीच्या मुळ खऱ्या पालकांचा शोध घेण्याचेही आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली आरोपी राणी शिवाजी यादव हिचा सातव्या महिन्यात गर्भपात झाला होता. हे तिच्या पतीला माहिती नव्हते. म्हणून तिने राजेंद्र प्रभाकर नागपुरे यांच्याकडे असलेल्या चार महिन्याच्या चिमुकलीचे चाकण परिसरातून अपहरण केले होते. आरोपी राणी ही काम शोधण्याचा बहाण्याने आली होती. राजेंद्र यांच्याकडे तिने काम मिळवले आणि त्यानंतर धनश्री या चार महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करून पसार झाली होती.
ही बाब समोर आल्यानंतर राजेंद्र यांनी चाकण पोलिसात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून राणी यादव हिला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील कुत्तर विहिर येथून अटक करून चिमुकलीची सुटका केली आहे. याप्रकरणी अद्याप संपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, चार महिन्याची चिमुकली ही फिर्यादी राजेंद्र यांची मुलगी नसल्याचे समोर आले आहे. ही बाब त्यांनी पोलिसांपासून लपवून ठेवली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. धनश्री ही चिमुकली प्रेमसबंधातून एका खासगी रुग्णालयात जन्माला आलेली होती. फिर्यादी राजेंद्र नागपुरे यांचे आणि त्यांच्या पत्नीचे नाव चिमुकलीचे आई वडील म्हणून टाकले होते. तेव्हा पासून नागपुरे दाम्पत्य हेच चार महिन्याच्या चिमुकलीचा सांभाळ करत होते. तरी, मूळ पालकांनी धनश्री ची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
त्यामुळे आता तिच्या खऱ्या माता पित्याचा शोध घेण्याचेही आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
Comments are closed