पुणे,दि.२७.( punetoday9news):-
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी”
सुरेश भट रचित या काव्याच्या पंक्ती कानावर पडतात तेव्हा नकळतच आपण मराठी असण्याचा अभिमान वाटतो. छाती मराठीपणाच्या गर्वाने फुलते. आज 2७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. मराठी साहित्यातील थोर प्रतिभावंत रत्न वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन , मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .
मराठी भाषेला उत्तुंग शिखरावर नेऊन पोचविणारे वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ ला झाला. त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे .त्यांचे वडील वकिलीचा व्यवसाय करत होते. शिरवाडकरांना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले. दत्त पूर्वी त्यांचे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यानंतर त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव च्या लोकल बोर्ड च्या शाळेत झाले .पुढील शिक्षण नाशिक मध्ये. कुटुंबात त्यांना तात्या म्हणून संबोधले जायचे. पुढील आयुष्यात तात्यासाहेब याच नावाने ओळखले जाऊ लागले .त्यांना क्रिकेट व नाटक याचे अतिशय वेड होते. कुसुमाग्रज या टोपणनावाने त्यांनी साहित्य लेखन कार्य केले .कुसुमाग्रज हे नाव त्यांनी का निवडले असेल ? तर त्यांना कुसुम नावाची एक छोटी बहिण होती, कुसुम चे अग्रज म्हणून त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केले .
शालेय जीवनातच त्यांनी काव्य लेखनाचा श्रीगणेशा केला १९२९ साली देवदत्त नारायण टिळक यांच्या बालमेध मेवा या मासिकात त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह ध्रुव मंडळाकडून प्रसिद्ध झाला. त्यापुढील काळात एक से बढकर एक काव्यसंग्रह निघाले. विशाखा, समिधा, किनारा ,मराठीमाती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, छंदोमयी, मारवा, रसयात्रा, आणि प्रवास पक्षी इत्यादी काव्यसंग्रह. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहास साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले. आत्मनिष्ठ व समाजनिष्ठेची जाणीव असणारे, मराठी भाषेतील, सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान असे रत्न कुसुमाग्रज, हे वि. स. खांडेकरानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक. वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांना विचारले गेले ,की हा पुरस्कार अजून कोणाला मिळाला पाहिजे होता असे तुम्हाला वाटते. तेव्हा वि स खांडेकर म्हणाले होते, कुसुमाग्रजांना आणि ते बरोबर तेरा वर्षांनी खरे झाले.१९८७ ला कुसुमाग्रजांच्या साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला, तेव्हा महाराष्ट्राला आनंदाची भरती आलेली होती, तत्कालीन ज्ञानपीठाचे अध्यक्ष श्रीयांश प्रसाद जैन म्हणाले होते की, “हा कुसुमाग्रजांचा गौरव नसून , कुसुमाग्रजांमुळे ज्ञानपीठ पुरस्काराचा गौरव झाला आहे”. तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष बलराम जाखड यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. त्यांनी कुसुमाग्रजांचा साहित्यिक कोलंबस म्हणून गौरव केला. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळावा म्हणून आपल्या काव्यातून जनजागर केले. मराठी भाषेचे वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात,
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्याती शिळा
‘कणा’ ही कविता तर प्रत्येक तरुणाला बळ, प्रोत्साहन देणारी
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा
कुसुमाग्रजांनी १९३२ ला नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात भाग घेतला होता, स्वातंत्र्यलढ्यात हि भाग घेतला होता, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या क्रांतिकारक काव्यात दिसून येते जसे
गर्जा जय जय कार क्रांतीचा गर्जा जय जय कार
महात्मा फुले, आंबेडकर, साने गुरुजी यांच्यावरही काव्यरचना केली. ऐतिहासिक काळात घडलेल्या घटनांवर ही काव्य लिहिले.
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनी क्रुसावर चे
वीरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
तसेच
वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात
ही काव्य ऐकताना, वाचताना आपल्यासमोर साक्षात ऐतिहासिक प्रसंग उभा राहतो. सामाजिक अन्याय व विषमता या विषयावर तर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून कठोर टीका केली
नको ग नको ग आक्रंदे जमीन
पायाशी लोळत विनवी नमून धावसी मजेत वेगात वरून आणिक खाली मी चालले चिरून
आगगाडी व जमीन काव्यात त्यांच्या ही भावना दिसून येते.
कुसुमाग्रजांनी प्रेम काव्य ही लिहिली.
उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
१९३४ ला बी ए झाल्यानंतर कुसुमाग्रजांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. सारथी, स्वराज्य, प्रभात ,धनुर्धारी, नवयुग अशा वृत्तपत्रात १९३८ ते१९४६या काळात काम केले. पत्रकारितेच्या निमित्ताने ज्यावेळी कुसुमाग्रज मुंबईत आले ,तेव्हा मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीसाठी झटणारे भालेराव, कुसुमाग्रजांना म्हणाले की, “मराठी रंगभूमी मृतप्राय होऊ नये असे वाटत असेल, तर तू नाटक लिही”. खरे पाहता कुसुमाग्रजांचा मूळचा पिंड कवीचा तरीही त्यांनी नाट्य लेखनास प्रारंभ केला.आणि
बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. आनंद, आमचं नाव बाबूराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकयी , कौंतय,जेथे चंद्र उगवत नाही, दिवाणी दावा, दुसरा पेशवा, दूरचे दिवे, देवाचे घर, नाटक बसते आहे, महंत ,मुख्यमंत्री, ययाती देवयानी ,नटसम्राट,राजमुकुट विदूषक, वीज म्हणाली धरतीला ,वैजयंती यासारख्या मराठी नाटकाची भर मराठी साहित्यात घातली. नटसम्राट सारखे नाटक श्रीराम लागू व नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिकेने कितीतरी काळ मराठी रंगभूमीवरच नव्हे, तर मराठी नाट्य रसिक मनावरही गाजले. अंतराळ, अपॉइंटमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, बारा निवडक कथा ,सतारीचे बोल हे कथासंग्रह. तर कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णवा या कादंबऱ्या. दिवाणी दावा, देवाचे घर, प्रकाशाची दारे, बेत, संघर्ष, इतर एकांकिका या एकांकिकेचे लेखन केले. आहे आणि नाही, एकाकी तारा,एखाद पण एखाद फुल, प्रतिसाद ,बरे झाले देवा, मराठीचिया नगरी, विरामचिन्हे यांसारखे लघुनिबंध लिहून मराठी मनावर अधिक काळ राज्य केले. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे, या मताचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. असा हा मराठी साहित्यातिला शुक्रतारा १० मार्च१९९९ ला महाराष्ट्राच्या मातीतून हरपला.
त्यांच्या कितीतरी साहित्यकृतीचा महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने, साहित्य अकादमीने, पुणे विद्यापीठाने पुरस्कार देऊन सन्मान केला.अंतराळातील एका तार्यास कुसुमाग्रज हे नाव देण्यात आले. नाशिक मधील टिळकवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी मराठी पुस्तकांचे सुसज्ज असे ग्रंथालय आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या, मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी मनाला, मराठमोळ्या माणसांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र
राणी जाधव
अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा फुलवडे आंबेगाव, पुणे.
जाहिरात:-
Comments are closed