पुणे,दि.२६( punetoday9news):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. शिवशाहीत बलात्काऱ्यांचा चौरंग व्हायचा. आता चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे .
वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी पोलिसांच्या भुमिकेबद्दल संशय व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहोत. तुमची छबी तशीच राहू द्या, आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही.”
तसेच शक्ती कायद्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे मंत्री आणि नेत्यांना क्लीन चीट द्यायची, अशी तरतूद आहे का, असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यांनी यावेळी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
• साहेब संजय राठोडला पाठिशी घालणार नाहीत: चित्रा वाघ.
मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला तर ते संजय राठोडला पाठिशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
• ‘संजय राठोड मिस्टर इंडिया आहे का?’
संजय राठोड हे राज्यभरात फिरतात. मात्र, पोलिसांना ते दिसत नाहीत. संजय राठोड हे पाच-साडेपाच फुटांचे असतीलच. ते पोलिसांना न दिसायला काय मिस्टर इंडिया आहेत का, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
• संजय राठोडांसाठी शिवसेनेचं खास ‘सोशल डिस्टन्सिंग’?
पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत आता शिवसेनेनं खास ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही स्थानिक शिवसैनिक हजर नव्हता. विशेष म्हणजे संजय राठोड हे नागपूरचे संपर्कमंत्री आहेत. तरीही संजय राठोड यांच्या स्वागतासाठी एकही शिवसैनिक न येणे, ही सूचक बाब मानली जात आहे.
Comments are closed