मुंबई,दि.२७( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनासारख्या महासंकटातदेखील सदर परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 14 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येत आहे.

या पुस्तकामध्ये मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङमयातील खंड पहिला मंडळाने गतवर्षी प्रकाशित केला असून यावर्षी दुसरा खंड ग्रंथरुपाने मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे.

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ रचना करणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङमयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङमयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध वाङमयीन योजनांबरोबरच उपरोक्त उद्दिष्ट पूर्तीसाठी मंडळाकडून सातत्यपूर्ण मौलिक ग्रंथांची निर्मिती करण्यात येत आहे.

मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार योजनेअंतर्गत कमलाकर अंबेकर लिखित भारतरत्न नानाजी देशमुख व प्रा. चंद्रकुमार नलगे लिखित डॉ. ग.गो.जाधव यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी, त्यांचे कार्य व योगदान मांडणारी चरित्रेदेखील मंडळ प्रकाशित करीत आहे. याबरोबरच भारतीय नाट्यशास्त्र, पाश्चात्त्य नाट्यशास्त्र आणि निवडक मराठी नाट्यरुपे संबंधित महत्त्वाच्या पारिभाषिक संज्ञांचा उलगडा करणारा, नाटक आणि रंगभूमीसाठी सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचा असणारा, अत्यंत मौलिक स्वरुपाचा नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह हा डॉ. विलास खोले यांचा ग्रंथ मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित होत आहे. या मराठी ग्रंथांसोबतच एकोणिसाच्या शतकात जर्मन आणि रशियन साहित्याच्या  इतिहासात मानाचे स्थान पटकावेल्या लघुकादंबऱ्यांची ओळख करुन देणाऱ्या सुनंदा महाजन व अनघा भट संपादित तिकडून आणलेल्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे मौलिक वाङमय देखील मंडळाकडून प्रकाशित होत आहे. याबरोबरच वाङमय महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या समग्र वाङमयातील गुरुवर्य केळुसकर यांचे डॉ. राजन गवस यांनी संपादित केलेले सेनेका व एपिक्टेटस यांची चरित्र व बोधवचने हे पुस्तक मंडळ प्रकाशित करीत आहे.

याबरोबरच मंडळाच्या पुनर्मुद्रण योजनेंतर्गत अण्णाभाऊ साठे यांचे आगळेपण सिद्ध करणारे निवडक साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङमय या ग्रंथांच्या माध्यमातून मंडळाकडून पुणर्मुद्रित करुन प्रकाशित करण्यात येत आहे.

धर्मशास्त्राचा इतिहास उलगडणारे धर्मशास्त्राचा इतिहास (पूर्वाध) धर्मशास्त्राचा इतिहास (उत्तरार्ध) ही पुस्तके मंडळ प्रकाशित करीत आहे. तसेच लयतालाच्या शास्त्रीय सिद्धांत परंपरेची ओळख करुन देणारा लयतालविचार हा ग्रंथ मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात येत आहे. प्राचिन ग्रीसचा महाकवी होमरलिखित ‘इलियद’ हे महाकाव्य मंडळ पुनर्मुद्रित करुन प्रकाशित करीत आहे. भाषेविषयी प्राचिन भारतीय विचारवंतांनी जे चिंतन व विश्लेषण केले आहे, त्याचा परिचय करुन देणारे ‘पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान’ हे पुस्तक मंडळाकडून पुनर्मुद्रित करुन प्रकाशित होत आहे. शुल्बसूत्रांची आजच्या भौतिकी विज्ञानासंदर्भात उपयुक्तता विशद करणारा ‘कात्यायन शुल्ब सूत्रे’ हा ग्रंथ मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्राचा परिचय करून देणारा ग्रह-गति सिद्धांत (किंवा ज्योतिर्गणिताची मूलतत्वे)’ हे पुस्तक देखील मंडळाकडून पुनर्मुद्रित करुन प्रकाशित करण्यात येत आहे.

जाहिरात:-

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!