• शिवसृष्टी उद्यानात सक्षम सागर कारळे या चार वर्षाच्या मुलाचा घसरगुंडीवर खेळताना अपघात झाला. फायबरच्या घसरगुंडीच्या फटीत उजव्या पायाची करंगळी अडकुन अपघात झाल्याने यात सक्षमला उजव्या पायाची करंगळी गमवावी लागली आहे.

सांगवी,ता.२८(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील लॉकडाऊनमधे बंद असलेली उद्याने अनलॉकमध्ये शासनाच्या नियम व अटी शिथील झाल्यावर खुली करण्यात आली. मात्र जवळपास आठ महिने बंद असल्याने व अगोदरच डागडुजीला आलेल्या खेळण्यांची पुरेशी देखभाल न केली गेल्याने सक्षम कारळे  या चिमुकल्याला आपली पायाची करंगळी गमवावी लागली आहे. 

 

जुनी सांगवीत महापालिकेची पाच उद्याने असून यात संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वेताळ महाराज उद्यान, शिवसृष्टी उद्यान यांचा समावेश आहे. उद्यानातील घसरगुंडी, गजिबो, व इतर जुनी तुटलेली बाके, रंग उडालेली खेळणी यामुळे उद्यानांची दुरावस्था दिसून येते.
पीडब्ल्यूडी मैदानावरील बॅडमिंटन हाॅल शेजारील संत सावतामाळी  उद्यानात प्रवेशद्वाराला लावलेला पत्रा वाकला आहे. बसण्यासाठी असलेला लोखंडी बाकडा गंज लागून तुटला आहे. बंद बोगदा असलेल्या फायबरच्या घसरगुंडीचे तुकडे निघाले आहेत. उद्यानात कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. सकाळी या उद्यानात व्यायामप्रेमी मंडळी मोठ्या प्रमाणावर येते.

शिवसृष्टी उद्यानात शिवशिल्पे साकारण्यात आलेली आहेत. परिसरातून लहान मुलांना शिवशिल्पे दाखवण्यिसाठी या उद्यानात नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र येथील हिरवळ सुकली आहे. हातात मशाल घेवून मावळ्यांच्या प्रतिकृती शिल्पांची रंग उडून दुरवस्था झाली आहे. यावरील धुळ, मातीमुळे दिव्यांचा प्रकाश अंधूक झाला आहे.

संत गोरोबा कुंभार उद्यानातील  खेळण्यांचीही दुरावस्था झालेली आहे. येथे लावण्यात आलेल्या फायबर गजिबो खेळण्याचे तुकडे पडले आहेत. अस्वच्छता रंग उडालेली जुनी खेळणी यामुळे यात बकालपणा आला आहे.
वेताळ महाराज उद्यान- पवना नदी काठावरील वेताळ महाराज उद्यानात मद्यपी मंडळींचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने या उद्यानात येणाऱ्या नागरिकांची संख्या इतर उद्यानापेक्षा फार कमी असते. त्यामुळे या ठिकाणी अड्डा बनवून बसणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.


छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे सांगवीतील सर्वात मोठे उद्यान असुन या उद्यानात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गर्दीची संख्या पाहता लहान मुलांना खेळण्यासाठी येथे खेळण्यांची संख्या कमी आहे. येथील जुनी खेळणी बदलून नवीन खेळणी अधिक संख्येने  बसवण्यात यावी अशी नागरीकांची मागणी आहे.

शिवसृष्टी उद्यानात सक्षम सागर कारळे या चार वर्षाच्या मुलाचा घसरगुंडीवर खेळताना अपघात झाला. फायबरच्या घसरगुंडीच्या फटीत उजव्या पायाची करंगळी अडकुन अपघात झाल्याने यात सक्षमला उजव्या पायाची करंगळी गमवावी लागली आहे. संबंधित उद्यान प्रशासनाचे येथील देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सक्षमचे वडील सागर कारळे म्हणाले,माझ्या मुलाचा अपघात झाला तसा दुस-या मुलांवर असा प्रसंग ओढवू नये.

येथील सर्व दुरूस्त्या करण्याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.ती घसरगुंडी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. –  जे.व्ही.पटेल. उद्यान अधिकारी ‘ह’ प्रभाग.

याबाबत आयुक्तांना लेखी तक्रार दिली आहे.दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. – प्रशांत शितोळे. शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

 

Comments are closed

error: Content is protected !!