मुंबई, दि. २८( punetoday9news):- विरोधकांनी केलेल्या आंदोलनाच्या वाढत्या दबावाने वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले कि, विरोधी पक्षाने घाणेरडे राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे, यासाठी मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावे म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी सूचक विधान केले होते. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने घेतला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले होतं.
Comments are closed