पुणे,दि.२८ (punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ, पौडरोड मधील कनिष्ठ महाविद्यालय विभागाने ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती व “मराठी भाषा गौरव दिन” प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेचे महत्व पटवून देताना आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ” माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा , हिच्या संगे जागतील माय देशांतील शिळा ” अशी मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण होते , असे सांगून आपण मराठी भाषेचा आग्रह सर्व ठिकाणी धरला पाहिजे, मराठी शिकणाऱ्या मुलांमध्ये मराठी भाषेचे महत्व शिक्षकांनी रुजवून मराठी भाषेचा प्रसार व प्रचार आपण केला पाहिजे तसेच आपण दिवसभरात फोनवर बोलताना हॅलो ऐवजी नमस्कार असे म्हटले पाहिजे,त्याचप्रमाणे आपण एसएमएस करून किंवा व्हाट्सएप व ई-मेल सारखी प्रसार माध्यमे वापरून दररोज संदेश किंवा माहिती पाठवितो तो संदेश किंवा माहिती पाठवताना मराठी मध्येच लिखाण करून पाठवली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषेवरील प्रेम जतन होईल. असे सांगून सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांना जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. संजय भोईटे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा परिचय सांगून मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली ,मराठी भाषा जर व्यावहारिक भाषा झाली तर ती उदरनिर्वाहाची भाषा होऊ शकते व व्यवहारात मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त झाला तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो असे सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी अकरावी विज्ञान शाखेची कुमारी प्रणिता जोगदंडे व मृदुला फडाळे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले . तसेच ज्ञान मिळवण्यासाठी मराठी साहित्यामध्ये श्रेष्ठ असे ग्रंथ श्रेष्ठ साहित्यिकांनी लिहून ठेवले आहे असे शंकराचार्यांच्या उदाहरणातून पटवून दिले.त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास वोकॅशनल विभागाचे प्रमुख प्रा.अरुण शिंदे कनिष्ठमहाविद्यालयातील व व्यवसाय अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच अकरावी व बारावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार विज्ञान शाखेतील गणित विभागाचे प्रमुख पाटील भागवत युवराज यांनी मानले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ विभागाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. अर्चना पाटील यांनी केले.
Comments are closed