मुंबई,दि.२(punetoday9news):- मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपुर्त केला.
गृहमंत्री अनिल देशमुख यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीने 28 फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबईच्या ईलेक्ट्रीकल इन्फ्रास्टक्चरमध्ये चीन देशाने मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी दि. 1 मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसेच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे.
देशमुख म्हणाले की, मुंबईत वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले की, १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीकोनातून तपास करणे आवश्यक वाटल्याने गृहमंत्री देशमुख यांच्याकडे तपासाबाबत विनंती केली होती. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, ऊर्जा विभागाने याप्रकरणी गठित केलेल्या तांत्रिक तपास समिती आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सायबरचा अहवालही प्राप्त झाला आहे. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या अहवालांच्या अनुषंगाने अधिक माहिती विधानमंडळात सादर केली जाईल.
Comments are closed