मुंबई ,दि.२( punetoday9news):-  कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. आधीच अर्थिक संकटात असलेल्या वृत्तपत्रसृष्टीचे तर अक्षरश: अस्तित्वच धोक्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्रांची छपाई बंद होती. त्यामुळे शासनस्तरावर अंकांची हजेरी कशी द्यावी हा पेच निर्माण झाला होता.

त्यामुळे राज्यभरातील संपादक, मालक, व्यवस्थापक व पत्रकार कोंडित सापडले होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्यसंघटक संजय भोकरे यांनी सुरुवातीपासून शासनाकडे लॉकडाऊनच्या काळातील अंक छपाईस सूट द्यावी, अशी मागणी केली होती. अखेर आज मंगळवार दि. 2 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने लॉकडाऊनच्या काळातील अंक छपाईस सूट देण्याचा शासन निर्णय लागू केला आहे. या निर्णयामुळे वृत्तपत्र व्यवसायाला दिलासा मिळाल्याने पत्रकार संघाचे राज्यभरातून आभार व्यक्त होत आहेत.

करोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात कडक लॉकडाऊनमुळे वृत्तपत्रांसमोर निर्माण झालेल्या समस्यांबाबत प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यातील संपादक, मालक, व्यवस्थापक व पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला होता. तसेच सप्टेंबर महिन्यात या सर्व पार्श्‍वभूमीचा विचार करून औरंगाबादेत संपादकांची पहिली गोलमेज परिषद घेतली होती. या परिषदेत सहभागी झालेल्या संपादकांनी लॉकडाऊन काळातील अंक छपाईस शासनाने सूट द्यावी असा ठराव मांडला होता.

वसंत मुंडे यांनी तेव्हापासून सतत शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला. शासनाने या पाठपुराव्याची दखल घेत लॉकडाऊनच्या काळातील म्हणजेच 25 मार्च 2020 ते 7 जून 2020 या कालावधीसाठी अंक छपाईस सूट दिली आहे. दैनिकांसाठी 100 अंकांची, सायं दैनिकांसाठी 93 अंकांची, साप्ताहिकांसाठी 15 अंकांची, अर्धसाप्ताहिक, द्विसाप्ताहिकांसाठी 27 अंकांची सूट देण्यात आली आहे. अर्थिक संकटात सापडलेल्या वृत्तपत्रसृष्टीला या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सुरूवातीपासून  लॉकडाऊन काळातील अंक छपाईस सूट देण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राज्यभरातून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!