जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सरकारी वकील साधना बोरकर(पाटील) यांनी लिहिलेला परखड लेख.   ‘काही वास्तव’

पिंपरी,दि.८( punetoday9news):- आज शहरात महिलांना न्याय देण्यासाठी अनेक केसेस चालवल्या जात आहेत. अन्याय झालेल्या स्री ला न्याय मिळायलाच हवा. पण काही प्रकरणात केवळ कौटुंबिक विसंवादातून पति-पत्नी वाद घालतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागतात.  त्यामुळे कुटुंब संस्था टिकवायची असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद असायलाच हवा.

त्या मुलीवर महिलेवर अन्याय होतो त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी या संकट काळात मुलीला मानसिक आधार देत तिच्या बाजूने ही भक्कम पणे उभे राहण्याची गरज असते मुलगी ही घरासाठी ओझे नसून ती कुटुंबाचा प्रमुख भाग म्हणून विचार करण्याची ही काळाची गरज आहे जुन्या रूढी-परंपरांना अनिष्ट प्रथांना मूठमाती देऊन स्त्री चे कर्तुत्व स्वीकारणे व आदरपूर्वक सन्मान करणे हे सुद्धा गरजेचे आहे . तिला तिच्या पायावर उभे करून तिच्या स्वप्नांना पंख द्या.

आजही परंपरेप्रमाणे मुली लग्न करून सासरी जातात नवरा बायको यांना एकमेकांना, तर मुलीला सासरच्या लोकांना समजून घेण्यात काही वेळ लागत असतो या दरम्यान एखादे मुल बाळ होते. अशा या स्थितीत दोघांनीही एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता असताना आपसात वाद घालतात व एकमेकांच्या चूका काढण्यातच वेळ घालवतात. अशी

अशी कित्येक उदाहरणे पहायला मिळतात. मुलांना ही आईवडील समजून न घेता “तूझी बायको-मुले तूझा संसार तूझा तू बघ” असे घरातील इतर सदस्यांकडून ऐकावे  लागते.

त्या छोट्याश्या वादाचे रूपांतर कोर्टात केसेस मध्ये होते व एकमेकांचे हेवेदावे काढण्यात कित्येक काळ व महत्त्वाची वेळ वाया घालवतात. आपला हा वेळ असा वाया न घालवता एकमेकांना समजून घेवून योग्य तो निर्णय घेतलेला केव्हाही योग्यच. जर दोघांचे तरीही पटत नसेल तर एकमेकांना त्रास देणे एकमेकांचे आयुष्य खराब करून टाकणे ही अशी सुडाची भावना दोघांनीही मनांत न ठेवता आपल्या जन्म दिलेल्या बाळांचा विचार करून आपल्या बाळाचे आयुष्य कसे घडवता येईल याकडे बघितले पाहिजे.

काही वेळा तर जन्म दिलेली आपत्य माझे नाही या भूमिकेत मुलगा असतो आणि बायकोला काहीही द्यायला लागू नये म्हणून असे आरोप करत बसतो. हे टाळण्यासाठी यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नात्याला पैशामध्ये मोजू नका लग्न संबंध जुळवताना मने जुळतात का? हे तपासा. आपले विचार, आवड, नावड , इच्छा, आकांक्षा एकमेकांना उघडपणे बोलणे आवश्यक आहे.

अन्यथा पुढे न्यायालयाची वारी करण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो . बायको कंटाळून जाईल, निर्णय घेईल व घटस्फोट देईल अशा आशा काही पुरूषांना असतात त्यामुळे वारंवार पुरूषी अहंकार गाजवत पत्नीस त्रास देतात . तर काही जण पोटगी द्यायला लागू नये म्हणून स्वत:ची प्रॅापर्टी , मासिक उत्पन्न लपवण्यात गुंतलेलेले असतात .

मात्र या सर्व प्रकारात जन्म दिलेल्या बाळांचा काय दोष? थोडीतरी माणुसकी म्हणून तरी त्या बाळांचे आयुष्य खराब होवू नये याकडे दोघांनीही विचार करावा व कोर्टात केसेस साठी वेळ वाया न घालवता त्या चिमुकल्यांच्या भविष्याचा विचार करावा.

महीलांनी देखील स्व:कतृत्वान बनवण्यात आपली ताकद लावायला हवी.  स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य शिक्षण घेतले पाहिजे. नोकरी, व्यवसाय करायला हवा. स्वतःस आर्थिक दृष्ट्या सक्षम बनायला हवे. आजच्या  मुलींनी आत्मनिर्भर होऊन “माझ्या मनगटात ताकद आहे” ही भावना मनांत ठेवावी व स्वत:वर शिंतोडे उडवून घेण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे राहून आत्म सन्मानाने जगावे.

अशा प्रकारे शिक्षण, आत्मविश्वास, साहस व सुसंवाद असलेली महिला ही इतरांना मार्गदर्शक बनू शकते. केवळ चुल आणि मुल यात न अडकता कुटुंबाबियांशी सुसंवाद ठेवून स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आकाशात मुक्त उंच गगणभरारी घेणारी ठरू शकते. व अशा प्रकारे प्रत्यक्षात बदल केल्यास जागतिक महीला दिनाचे खऱ्या अर्थाने सार्थक असेल.

साधना बोरकर(पाटील)

सहाय्यक सरकारी अभियोक्ता.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!