मुंबई, दि.११(punetoday9news):- यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त या जिल्हा परिषदांसाठी अनुक्रमे 30 लाख रुपये, 20 लाख रुपये आणि 17 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) पंचायत समितीने पटकावला. कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे 20 लाख रुपये, 17 लाख रुपये आणि 15 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यशवंत पंचायत राज अभियान सन 2020-21 (मुल्यांकन वर्ष 2019-20) अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी 12 मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभागस्तर व राज्यस्तरावर “यशवंत पंचायत राज अभियान” पुरस्कार देण्यात येतात. ग्रामपंचायतींसाठी स्मार्ट ग्राम व्हिलेज योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. यशवंत पंचायत राज पुरस्कार निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल करून क्षेत्रिय पडताळणी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
विभागस्तरीय पुरस्कारांचीही घोषणा
मंत्री मुश्रीफ यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांचीही घोषणा केली. याअंतर्गत कोकण विभागात कुडाळ (जि. सिंधुदूर्ग), मालवण (जि. सिंधुदूर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड), नाशिक विभागात राहाता (जि. अहमदनगर), नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक), पुणे विभागात कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डूवाडी (जि. सोलापूर), औरंगाबाद विभागात लातूर (जि. लातूर), नांदेड (जि. नांदेड), शिरुर अनंतपाळ (जि. लातूर), अमरावती विभागात अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ) तर नागपूर विभागात भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर) या पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार पटकावले. या पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे 11 लाख रुपये, 8 लाख रुपये आणि 6 लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.
या अभियानांतर्गत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना एकूण 2 कोटी 69 लाख रुपये इतक्या रकमेचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी पुरस्कार विजेत्या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. चालू वर्षातही राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांनी यशवंत पंचायत राज अभियानात चांगली कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
Comments are closed