• एकीकडे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार कडक कारवाई करण्याची सूचना देत आहेत तर दुसरीकडे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील हाॅटेल, चहाची दुकाने, मेडिकल शाॅप, किराणा दुकानातून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन. 

• सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ. 

• प्रशासनाची कारवाई फक्त सामान्य नागरिकांवर, वाहनचालकांवर होत असल्याचा आरोप. 

• खुलेआम नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्यांना अभय का ? असा प्रश्न उपस्थित. 

पुणे, दि.१२( punetoday9news):- जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.


कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती घेतली. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गृह विलगीकरणातील नागरिकांशी संपर्क व समन्वय ठेवावा. गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशावेळी कठोर कारवाई करावी, तसेच गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी पथकांची नेमणूक करावी. कुठेही गर्दी होता कामा नये. मास्क न वापरणाऱ्यांवर वेळीच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निदानासाठी चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.
खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती आवश्यक असून यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. सोसायटयामध्येही याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!