मुंबई,दि.१४( punetoday9news):- मुंबई पोलीस दलात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे, अर्णब गोस्वामी प्रकरणी चर्चेत आलेले API सचिन वाझे. यांच्या पोलिस दलातील प्रवासाविषयी जाणून घेऊ या.
सचिन वाझे यांचे पूर्ण नाव, सचिन हिंदूराव वाझे. सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. सचिन वाझे यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली. तेव्हापासून वाझे यांचा पोलीस दलातील प्रवास सुरू झाला.
“पोलीस दलात वाझे यांना पहिली पोस्टिंग मिळाली नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये . त्यानंतर 1992 च्या आसपास त्यांची बदली ठाण्यात झाली.”
मुंबईत अंडरवर्ल्डने 1990 च्या दशकात डोकं वर काढण्यास सुरूवात केली होती. दाऊद, छोटा राजन आणि अरूण गवळी सारखे डॉन मुंबईच्या रस्त्यांवर रक्तपात करत होते. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडली.
मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या शार्प शूटर्सचे एक-एक करून एन्काउंटर करण्यास सुरूवात केली होती. सचिन वाझे त्याचसुमारास मुंबईत बदलीवर रुजू झाले होते.
क्राइम ब्रांचमधूनच त्यांचा सबइन्स्पेक्टर ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असा प्रवास सुरू झाला.
सचिव वाझे क्राइम ब्रांचमध्ये असताना, डिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा यूनूसला ताब्यात घेतले होते. पण, 2003 मध्ये ख्वाजा पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.
पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. काही अधिकाऱ्यांवर ख्वाजा मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. सचिन वाझे या अधिकाऱ्यांपैकीच एक होते.
ख्वाजा मृत्यू प्रकरणी मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केले होते. नंतर ते पुन्हा रूजू झाले.
“सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलात ‘टेक्नो-सॅव्ही’ अधिकारी म्हणून ओळख होती. मुंबईत सायबरक्राइम करणाऱ्यांवर कारवाई पहिल्यांदा सचिन वाझे यांनीच केली होती.
वाझे यांनी 1997 मध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रेडीटकार्ड रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर त्यांना त्यांचे सहकारी ‘टेक्नो-सॅव्ही’ अधिकारी म्हणून ओखळू लागले.
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काही महिन्यांपूर्वी रायगड पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सचिन वाझे त्या टीमचे नेतृत्व करत होते.
अर्णब गोस्वामी यांच्या कतिथ TRP घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे. आणि आता हिरेन मनसुख प्रकरणात त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
Comments are closed