पिंपरी,दि.१५( punetoday9news):- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियम अधिक कडक केले असून, मंगल कार्यालये सार्वजनिक कार्यक्रम यावर बंधने आणली आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असताना राजकीय पक्षांमार्फत आयोजित क्रिकेटच्या स्पर्धांवर कोणतेही नियंत्रण नाही. तसेच आयोजकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. गर्दी जमविणाऱ्या आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने राज्य सरकारने कार्यक्रमांना किती लोकांची उपस्थिती असावी, या विषयी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडत आहेत. मात्र, दुसरीकडे अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा जोरात सुरू आहेत. या स्पर्धांच्या ठिकाणची उपस्थितांची संख्या हजारावर असते. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना सरकारचे. अन्य ठिकाणी लावलेले नियम स्थानिक क्रिकेट स्पर्धांना नाहीत का ? की केवळ राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या स्पर्धा, कार्यक्रमांना या नियमातून सूट दिली आहे, हे पोलिसांनी स्पष्ट करावे. अन्यथा आयोजकांवर गर्दी जमविल्याप्रकरणी कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रामभाऊ जाधव यांनी केले.
Comments are closed