पिंपरी ,दि.१९ ( punetoday9news):- शाश्वत विकासासाठी नागरी सहभाग आणि समाधान महत्वाचे असून नागरिकांच्या संकल्पनांमधून शहराची जडणघडण उत्तम पद्धतीने होत असते असे प्रतिपादन पोलंडचे भारतातील सहाय्यक महावाणिज्य दूत डॅमियन इरझिक यांनी केले .
पिंपरी चिंचवड शहरातील माहिती आणि तंत्रज्ञान , संस्कृती त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी आज डॅमियन इरझिक यांनी शहराला भेट दिली त्यावेळी बोलत होते . महापौर माई ढोरे यांनी डॅमियन इरझिक यांचे महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये स्वागत केले . यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे , नगरसदस्या सिमा सावळे , आशा शेंडगे – धायगुडे आदी उपस्थित होते .
महापौर ढोरे आणि डॅमियन इरझिक यांच्यामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती आणि पोलंड देशातील संस्कृती तसेच शहरातील विविध विकास कामे आणि प्रकल्पांबद्दल चर्चा झाली . पोलंड आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक संदर्भाना उजाळा यावेळी इरझिक यांनी दिला . पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विकास प्रशंसनीय आहे . पोलंडमधील शहरांच्या तुलनेने पिंपरी चिंचवड शहर लोकसंख्या , क्षेत्रफळ आदींबाबत मोठे असून देखील महानगरपालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणा – या सुविधांचे व्यवस्थापन उत्तम आहे . पिंपरी चिंचवड शहर आणि पोलंड देशातील महत्वाच्या शहरांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान , संस्कृती त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणूक आदींबाबत आदानप्रदान करण्यासाठी सिस्टर सिटी सामंजस्य करार करण्याचा मानस आहे असे पोलंडचे भारतातील सहाय्यक महावाणिज्य दूत डॅमियन इरझिक यांनी सांगितले . पक्षनेते नामदेव ढाके आणि स्थायी समिती सभापती ॲड.नितीन लांडगे यांनी पोलंड मधील विविध शहरांमधील विकासकामे , प्रशासकीय कामकाज आदींबाबत सविस्तर माहिती घेतली . पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी , प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून महानगरपालिकेच्या कामाच्या पद्धतीबद्दल पक्षनेते ढाके यांनी इरझिक यांना माहिती दिली . पोलंडमध्ये नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे आदानप्रदान झाल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल असेही ढाके यांनी यावेळी सांगितले . दरम्यान , आयुक्त राजेश पाटील आणि डॅमियन इरझिक यांच्यामध्ये शहरातील नियोजित विकासकामे , स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेले विविध प्रकल्प आणि भविष्यातील शहराचे नियोजन आदी बाबत सविस्तर चर्चा झाली . यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते.
संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड शहराच्या नगरपरिषद ते स्मार्ट सिटी पर्यंतच्या प्रवासाबाबतची माहिती यावेळी देण्यात आली . गुंतवणुकीसाठी शहरामध्ये महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणा – या सुविधांबाबत देखील यावेळी इरझिक यांना माहिती देण्यात आली . शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून पायाभूत सुविधांचा प्राधान्य क्रम निश्चित करण्याचे धोरण महानगरपालिकेने हाती घेतले असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले . अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना गतिमान सुविधा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.
Comments are closed