मुंबई,दि.२०( punetoday9news):- बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात पालकांच्या मनात अनेक शंका उपस्थित होत होत्या. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती आज (शनिवार) पत्रकारपरिषदेत दिली.
इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची त्यांनी जाहीर केले. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.
लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच, प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल)परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. अशी देखील त्यांनी माहिती दिली.
परीक्षा केंद्र –
कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.
परीक्षेची वेळ –
दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जातो. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
प्रात्याक्षिक परीक्षा –
इयत्ता दहावीच्या दरवर्षी प्रात्याक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहे.
Comments are closed