• फडणवीसांनी मागितला गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा. 

• चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केली  उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा.

 मुंबई,दि.२०( punetoday9news):- पोलिस विभागाच्या यंत्रणेला धक्का देत रोज नवनवीन माहिती समोर येत असताना आज सचिन वाझे प्रकरणात बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

या पत्रात “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते”, असा गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणावरून आता संपूर्ण  राज्यातले वातावरण तापले असून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे .

हे १००कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईतील १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर  प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असा हिशोबही गृहमंत्र्यांनी वाझेंना दिल्याचे सांगण्यात आले आहे.

हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपली प्रतिक्रिया ट्विट द्वारे दिली असून “कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा खोटा आरोप केला आहे ”, असे म्हटले आहे.

आता संपूर्ण राजकीय क्षेत्र ढवळून निघत असताना अजून काय नवीन प्रकरण समोर येणार ? आणि कुणाची नावे बाहेर येणार व खरोखर कारवाई होणार की संपूर्ण राजकीय घडामोडींवर पडदा पडणार ? असा प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!