पुणे,दि.२४(punetoday9news):-   उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशातच नव्हे तर जगभर पोहोचविणारे ‘भारत फोर्ज’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांच्या पाश्र्वभूमीवर सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरणारे बालशिवाजी ही प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी स्थापन झालेल्या त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. करोनाचे संकट कमी झाल्यानंतर एका विशेष कार्यक्रमात कल्याणी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी सांगितले.

कल्याणी हे तीन अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. फोर्जिग क्षेत्रात भारत फोर्ज ही जगात प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखली जाते. अमेरिकेतील मेरिटॉर, ब्राझीलमधील मॅक्सिकॉन व्हिल्स, इस्रायलमधील एल्बिट सिस्टिम्स लि. आणि राफेल अ‍ॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स अशा जगातील महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजचे संयुक्त उपक्रम कार्यरत आहेत.

आज जगभरात कंपनीचे दहा हजार कर्मचारी असून वार्षिक उलाढाल १.४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीमध्ये डेमलर, जनरल मोटर्स, व्होक्स वॅगन, जनरल इलेक्ट्रिक, कॅटर पिलर, बोईंग, रोल्स रॉईस यांचा समावेश आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!