पुणे दि. २९: अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०२० या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
  जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०२० ची माहिती असलेल्या पत्रकाचे प्रकाशन करुन व  चित्ररथाला  हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक प्रताप सिंग चव्हाण, व्यवस्थापक संजय शितोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तंत्र अधिकारी प्रमादे सावंत, कृषि सहायक राजपुत सी.एस. आदी उपस्थित होते.
  जिल्हाधिकारी राम म्हणाले, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२० मृग बहराकरीता फळपिकांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ५ जून २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बाधित राखणे हे आहे. तसेच  ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित  पिकांसाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महवेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी  हस्तक्षेप राहणार नाही, ही योजनेची प्रमुख वैशिष्टये आहेत. विमा हप्त्याचा दर शेतकऱ्यांना फळ पिकनिहाय प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के आहे.
  विमा कंपनीचे नाव बजाज एलाएन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी, पुणे असे असून टोल फ्री क्र. 18002005858, दुरध्वनी क्र.0206602666 , ई-मेल आय डी prmod.patil01@bajajallaianz.co.in हा आहे.  पिक विम्याच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषिअधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले आहे.
  या कार्यक्रमास  कृषि व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

#

Comments are closed

error: Content is protected !!