• सुलभ शौचालय उभारण्याची छावा मराठा संघटनेची मागणी .
पुणे,दि.२६(punetoday9news):- खडकी येथील रेंजहिल्स मार्केटमध्ये सुलभ शौचालय नसल्याने व्यापारी, नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे येथील मार्केटमध्ये सुलभ शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
        रेंजहिल्स मार्केट परिसरात एकही शौचालय नाही. महत्त्वाचे म्हणजे या परिसरात मोठे मार्केट असल्याने व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांची मोठी वर्दळ असते. तसेच जवळच केंद्रीय विद्यालय, रेंजहिल्स सेकंडरी हासस्कूल, रेंजहिल्स इंग्लिश स्कूल या तीन शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडायला येणारे पालकही मार्केटमध्ये येत असतात. याबरोबरच याच परिसरात मिलिटरी दवाखाना व सीजीएस दवाखाना आहे. इथे अनेक आजारावर उपचार होत असतात. त्यामुळे बाहेर गावाहून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांचे व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचे शौचालयाला जाण्यासाठी खूप हाल होत आहेत. महिला वर्गाचेही शौचालयाअभावी मोठे हाल होत आहेत. पुरुष परिसरात कुठेही आडोसा पकडून आपला कार्यभाग उरकीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. जुने शौचालय आहे, परंतु ते मोडकळीस आले आहे.
       ज्या प्रकारे खडकी बस स्टॉपजवळ शौचालय उभारले आहे. तशा प्रकारचे सुलभ शौचालय रेंजहिल्स मार्केट येथे उभारण्यात यावे, अशी मागणी छावा मराठा संघटनेतर्फे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ’कडे करण्यात आली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!