सांगवी,दि.२७( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठावरील पिंपळेगुरव, सांगवी, पिंपळे सौदागर मध्ये डासांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. नागरीकांना रात्र-रात्र झोप येत नाही. संध्याकाळ झाली की डासांचे “ ढल गया दिन हो गई शाम आने दो आना है” चालु होते. रात्रभर बॅट घेऊन डासांना वैतागुन शेवटी सर्वांना “ अभी-अभी तो आये हो अभी-अभी जाना है” म्हणावे लागत आहे.अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक यांनी पत्रका द्वारे मांडली आहे.
त्या म्हणाल्या अधिकारी व लोकप्रतिनिधी फक्त कधीतरी डासांची धुराडी पाठवून धुराळा उडवून देतात. कदाचित यांना डास चावत नाही किंवा हे सर्व कोरोना सोबतच डेंग्यू मलेरीयाची वाट पहात आहेत.
नदीतील जलपर्णीची लोकप्रतिनिधींकडून फक्त पाहणी होते कडक कारवाई करण्यात येण्याचा इशारा देण्यात येतो. न्युज चॅनेल अथवा वर्तमानपत्रात दिले जाते.
आता तर असे वाटायला लागले आहे की थोड्याच दिवसात कोरोनापेक्षा जास्त डेंग्यु मलेरियाचे पेशंट अधिक वाढतील. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे आम्ही काटेकोरपणे पाळतच आहोत पण “माझे कुटुंब तुमच्यामुळे आजारी” हे तुम्ही होऊ देऊ नका. असे मत व्यक्त केले आहे.
प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहरातील नदीकाठावरील रहिवाशांना दरवर्षीच या डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. जोपर्यंत पवना नदीतील पाणी पावसाळी पाण्याने वाहत असते तोपर्यंत डासांचा उपद्रव कमी असतो. एकदा पाऊस कमी झाला की पाणी थांबायला लागते आणि जलपर्णी फोफावायला सुरूवात होते. डासांसाठी पोषक परिस्थिती निर्माण होवून अक्षरशः मधमाशांप्रमाणे समुहाने डास गायनासह नृत्याविष्कार करत शिकारीला निघाल्याप्रमाणे दिसून येतात. सुरूवातीला काही दिवस लोक तक्रार करतात व नंतर शांत बसतात असा प्रशासनाचा समज आहे. काही अधिकारी खासगीत बोलताना म्हणतात पाऊस यायला पाहिजे. म्हणजे काय? तर आपले काम वाचायला हवे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर प्रशासनाने उपाययोजना करायला हव्या असे नागरिकांचे मत आहे.
Comments are closed