पिंपरी, दि. ४(punetoday9news):- कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील बेड ची संख्या अपुरी पडत असल्यामुळे शहरातील ६० खासगी रुग्णालयांच्या सेवा अधिग्रहीत केल्या आहेत.
या रुग्णालयांमध्ये कोविड-१९ संबंधी देण्यात येणा-या रुग्णसेवा, त्यापोटी आकारले जाणारे शुल्क व प्रक्रिया, बेड्सची संख्या व उपलब्धता, रुग्णांचा दैनंदिन डिसचार्ज अहवाल तसेच इतर प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने समन्वयक म्हणून अभियंत्यांच्या नेमणूका केल्या आहेत.
या खासगी रुग्णालयातील एकुण बेड पैकी किमान ५० टक्के बेड कोरोना बाधितांच्या उपचारासाठी राखीव ठेवले जाणार आहेत. या बेडचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने व्हावे यासाठी महापालिकेने सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर उपअभियंता विजय भोजने, संजय साळी, रविंद्र सुर्यवंशी, बापू गायकवाड यांची क्षेत्रीय कार्यालय निहाय नियुक्त करण्यात आलेल्या १९ कनिष्ठ अभियंत्यांच्या कामकाजावर नियंत्रक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
खासगी रुग्णालयांच्या बेड व्यवस्थापनचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आज आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्यासह नियंत्रक उपअभियंता आणि नियुक्त कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.
सध्याची परिस्थिती गंभीर असून वाढत्या कोरोना बाधित रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील ६० खासगी रुग्णालयांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याचे आयुक्त पाटील यांनी बैठकीत सांगितले. या रुग्णालयांशी समन्वय ठेवून तेथील बेड कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची वारंवार तपासणी बेड व्यवस्थापन नियंत्रण पथकाने करावी असे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिले. या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून वाढीव बिले आकारले जात असल्याच्या तक्रारी उद्भवल्यास शासन नियमाप्रमाणे बिल आकारले जाते किंवा नाही याची देखील या पथकाने पडताळणी करणे आवश्यक आहे. या रुग्णालयांना पथकाने नियमित भेटी देऊन बेड्सच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवावी तसेच बेड्सची माहिती अचूक पध्दतीने महापालिकेच्या कोविड डॅश बोर्डवर नोंदविली जाईल याची खात्री करावी अशा सूचना देखील आयुक्त पाटील यांनी संबंधीतांना दिल्या. यापुढे आवश्यकता भासल्यास इतर खासगी रुग्णालयांच्या सेवा देखील अधिग्रहीत करण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले. या कामकाजामध्ये हलगर्जीपणा तसेच कसूर करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील आयुक्त पाटील यांनी यावेळी दिला.
Comments are closed