सातारा,दि. ११( punetoday9news):- राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास जनता आणि मी ऐकणार नाही . उद्यापासून निर्बंध उठले पाहिजे.  त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही . यावरून मारामारी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी सरकार जबाबदार असेल असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर आक्रमक पवित्रा घेत लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले . हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते . या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला . उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे . लोकांची आर्थिक अवस्था सरकारने लक्षात घेतली पाहिजे . लॉकडाऊन झाल्यास लोकांची उपासमार होईल . सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात , असा सवालही त्यांनी विचारला . या लोकांच्या पाहिले तर ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत . त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच , असा अहवाल देत नाहीत , तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही , असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले .

 

 

Comments are closed

error: Content is protected !!