पिंपळे गुरव,दि.१२( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मधील सोमनाथ नवले यांनी आपल्या परसबागेत विविध फळझाडे लावली आहेत. यात आंबा ,काजू, चिकू , लिंबू , सीताफळ , शेवगा , जांभूळ , पेरू यांचा समावेश आहे.
नवले हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कर्मचारी सुद्धा आहेत. मात्र त्यांना झाडे लावणे व जोपासण्याचा चांगला छंद आहे. यांच्या परसबागेत आलेले आंबे पाहता बाजारातही एवढ्या मोठ्या आकाराचे आंबे उपलब्ध होत नाही याची प्रचिती येते . नवले यांनी मोठ्या आवडीने जोपासलेली ही विविध झाडे आज रसाळ फळे देत आहेत.
औषधी वनस्पती म्हणून गवती चहा , कोरफड, कढीपत्ता हे देखील लावण्यात आले आहे . तर झेंडू , गुलाब , सदाफुली, गुलमुस या फुलझाडांचीही येथे लागवड नजरेत भरते . या परसबागेत कुटुंबातील सर्व सदस्य आवडीने काम करतात. आवडीने म्हणून लावलेली झाडे आता सिजननुसार फळे देतात. आज कोरोना प्रादुर्भाव व बाजारात वाढती गर्दी पाहता प्रत्येकाने जागा असेल तिथे फळ झाडे, फुल झाडे व पालेभाज्या लावणे गरजेचे बनले आहे.
नवले म्हणाले , या झाडांकरता कोणते ही रासायनिक खत न वापरता फक्त जैविक पद्धतीने झाडे लावली आहेत . खतांमध्ये शेणखत , कम्पोस्ट खत वापरले जाते . त्यामध्ये घरातील कचरा घरात जिरवला जातो . घरा बाहेरील पाला पाचोळा गोळा करून देखील त्याचे ही खत बनवले जाते , सेंद्रीय खताचा वापर केल्यामुळे फळाना चव देखील चांगली येते . तसेच रासायनिक खतापासून शरिरावर होणारे दुष्परिणाम देखील टळतात.
आज शहरीकरणात गावांचे गाव पण हरवून मोठ-मोठ्या सिमेंटच्या भिंती उभ्या झाल्या असल्या तरी अशा पद्धतीने वृक्षसंवर्धन झाल्याने मानवाला निसर्ग विविध रूपाने आशिर्वाद देतो हे पहायला मिळते.
Comments are closed