पुणे,दि.२०( punetoday9news):- माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत . त्यांचे तरुण पुतणे तन्मय फडणवीस यांने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . तन्मय फडणवीसचे वय 45 वर्षांहून कमी आहे तसेच तो फ्रंटलाईन वर्कर नाही त्यामुळे त्याला लस कशी घेता आली ? असा प्रश्न विचारला जात आहे .
लस घेतानाचा फोटो तन्मयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता . लशीचा दुसरा डोस घेत आहोत असा संदेश फोटोसोबत दिला होता . नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली . पण तोपर्यंत फोटोचे स्क्रिनशॉट ट्वीटर , फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
तन्मय फडणवीस कोण ?
तन्मय फडणवीस हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आहे . माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा मुलगा अभिजीत फडणवीस यांचा तन्मय मुलगा आहे . शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत .
काँग्रेसने यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचाही साठा आहे का ? असा प्रश्न विचारला आहे .
प्रदेश काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट केले आहे . ” ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे . असे असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी ? भाजपच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक किडेमुंग्या आहेत का ? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का ? ” अशी टीका काँग्रेसने केली आहे .
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021
तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि, तन्मय फडणवीस याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली याबाबत आपल्याला कल्पना नाही. देवेंद्र ते म्हणाले , ” तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे . लस जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही . पण पात्रतेच्या निकषात नसेल , तर सर्वथा अयोग्य आहे . निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही . आज जरी १८ वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे , हे माझे ठाम मत आहे . ”
Comments are closed