पुणे,दि.२१( punetoday9news):- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्याचा काळ अतिशय कसोटीचा आहे. आव्हानात्मक आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घ्यावी. नियमित व कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांचे येत्या आठवड्याभरात लसीकरण पूर्ण करावे. सोबतच कोविडची व इतर रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती व रिफिलींग उद्योग आणि घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले.
पुणे परिमंडल अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील कोविडच्या संसर्गाबाबत मंगळवारी (दि. 20) आयोजित व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, प्रकाश राऊत व पंकज तगलपल्लेवार उपस्थित होते.
मुख्य अभियंता तालेवार म्हणाले की, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य अहोरात्र बजावत असताना कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपायात कोणतीही हयगय करू नये. आरोग्याची पूर्णतः गंभीरपणे काळजी घ्यावी. थोडी लक्षणे दिसल्यावर ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. पुणे परिमंडलात आतापर्यंत 511 पैकी 351 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर 150 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडबाधित कर्मचारी व कुटुंबियांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी परिमंडल व विभागस्तरावरील समन्वय कक्षांमार्फत कामे सुरु आहेत. पुणे परिमंडलामधील नियमित व कंत्राटी अशा एकूण 5165 पैकी 2356 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांनी येत्या आठवड्याभरात लस घ्यावी व त्यासाठी कार्यालयप्रमुखांनी प्राधान्याने आवश्यक कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी केली.
कोरोना संसर्गाच्या उद्रेकामुळे वर्क फ्रॉम होम सुरु झाले आहे. दुसरीकडे उन्हाच्या झळा वाढत आहे. अशा परिस्थितीत सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे अशी सूचना मुख्य अभियंता तालेवार यांनी केली. वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून ताबडतोब वीजपुरवठा सुरु करण्याच्या उपाययोजना कराव्यात. वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करावीत असे निर्देश मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिली. या बैठकीला पुणे परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
Comments are closed