चेन्नई, दि. २६(punetoday9news):- मद्रास उच्च न्यायालायने, राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. असे म्हणत निवडणूक आयोगाला फटकारत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी न्यायालाने सांगितले आहे की, जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असले तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे . उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात.
याचबरोबर न्यायालयाने, २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहात? अशी विचारणा करत, मतमोजणीवेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्ल्यूप्रिंट सादर करा, अन्यथा मतमोजणी रोखली जाईल, असा इशाराही निवडणूक आयोगाला दिला आहे.
मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायाधीश न्यायमूर्ती सेंथिलकुमार रामामूर्ती यांच्या खंडपीठासमोर करूर मतदारसंघात मतमोजणीदरम्यान कोविड -१९ प्रोटोकॉल सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे की नाही? या विषयावर चिंता व्यक्त करणार्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या ठिकाणी सुमारे ७७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Comments are closed