• अहमदनगरच्या खासदाराने दिल्लीतून रेमडेसिविरचा १० हजारांचा साठा नेल्याबद्दल न्यायालयाकडून आश्चर्य व्यक्त.
• उपलब्ध ऑक्सिजनचा पूर्णपणे पुरवठा न करण्यात आल्याबद्दल नाराजी.
दिल्ली, दि.२९( punetoday9news):- दिल्ली उच्च न्यायालयाने करोना उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल केल्याबद्दल, उपलब्ध ऑक्सिजनचा पूर्णपणे पुरवठा न करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लोकांचा जीव जात रहावा असे सरकारचे धोरण दिसत असल्याची टीका न्यायालयाने व्यक्त केली.
न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना, “हे चुकीचे आहे. नियम बनवताना बुद्धीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही असे वाटते. ज्यांच्याकडे ऑक्सिजनची सुविधा नाही अशा ठिकाणी रेमडेसिविर औषध दिले जाणार नाही. लोकांनी मरत रहावे अशीच तुमची इच्छा आहे, असे यावरुन वाटते,” असे मत नोंदवले. केंद्र सरकारच्या रेमडडेसिविर प्रोटोकॉलनुसार ऑक्सिजनवर असणाऱ्यांनाच हे औषध दिले जात आहे.
“रेमडेसिविरचा तुटवडा भरुन काढण्यासाठी प्रोटोकॉल बदलण्यात आले नाहीत. हे चुकीचे आहे. यामुळे डॉक्टरांना रुग्णांसाठी रेमडेसिविर औषध लिहून देता येणार नाही. या साऱ्यामधून नियोजनाचा आभाव दिसून येत आहे,” असेही न्यायालयाने केंद्राच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार करोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या आधारे रेमडेसिविर औषध पुरवले जात आहे. यासंदर्भात न्यायालयाने सुजय विखे पाटील यांचा थेट उल्लेख न करता अहमदनगरच्या खासदाराने दिल्लीतून रेमडेसिविरचा १० हजारांचा साठा नेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. एका खासदाराने दिल्लीमधून रेमडेसिविरचा दहा हजार औषधांची पाकीटे मिळवली आणि ती खासगी विमानाने महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये नेऊन त्याचं वाटप केले, हे आश्चर्यचकित करणारे आहे. पुढील काही दिवसांमध्ये रेमडेसिविरचे उत्पादन वाढल्यानंतर ते अधिक प्रमाणात उपलब्ध करुन दिले जाईल असेही केंद्राने न्यायालयाला सांगितले.
Comments are closed