पिंपरी, दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील कोव्हिड -१ ९ वॉर रूमला भेट दिली .
४५ वर्षांपुढील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्या नागरिकांमध्ये कोव्हिड -१ ९ संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे . लसीकरणामुळे कोव्हिड -१ ९ पासून काही प्रमाणात बचाव होत असल्याचे निदर्शनास येत असून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर आमचा भर राहील असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले .
महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हिड -१९ वॉर रूमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली . यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे , उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले , स्थायी समिती सभापती ॲड . नितीन लांडगे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , शिवसेना गटनेते राहुल कलाटे अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे , पुणे विभागीय आयुक्त सौरव राव , महापालिका आयुक्त राजेश पाटील , पुणे जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी डॉ . राजेश देशमुख यांच्यासह नगरससदस्य आणि अधिकारी उपस्थित होते . यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी कोव्हिड -१९ वॉर रूममधून होत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली . कोरोना रुग्णवाढीचा दर , मृत्यू दर , शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या , उपलब्ध ऑक्सिजन बेड्स , आयसीयु बेड्स , व्हेंटीलेटर बेड्स , बेड मॅनेजमेंट आणि हेल्पलाईन , ऑक्सिजन पुरवठा हेल्पलाईन , प्लाझ्मा हेल्पलाईन , ॲम्बुलन्स हेल्पलाईन , शववाहिका हेल्पलाईन, स्वस्थ आणि टेलीमेडिसिन हेल्पलाईन , कोविड केअर सेंटर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे कामकाज, महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मी जबाबदार या ॲप , कोव्हिड चाचणी केंद्र आणि लसीकरणाबद्दल अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ . क्रिस्टोफर झेव्हियर यांनी माहिती दिली . महापालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाला रुग्णालय , आकुर्डी रुग्णालय आणि थेरगांव रुग्णालयांत सर्व सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला दिल्या . अतिरिक्त रुग्णालयांची गरज भासल्यास घरकुल योजनेच्या प्रकल्पांमध्ये त्याबाबत नियोजन करावे अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली . महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि इतर व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण आणणे आवश्यक असून त्यासाठी नियोजन करावे तसेच ऑक्सिजन बचतीसाठी विशेष दक्षता घ्यावी असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले . महानगरपालिकेने कोरोना बाधितांसाठी सुरु केलेल्या विविध हेल्पलाईन्स तसेच बेड व्यवस्थापन आदी कामकाजाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी समाधान व्यक्त केले , शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करावा तसेच शहराला आवश्यक ऑक्सिजन कोटा कमी करू नये आणि आवश्यक लसींची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी यावेळी महापौर माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली . ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवून आवश्यकतेनुसार त्याचे वितरण करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे असे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed