पिंपरी ,दि .५(punetoday9news):- सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेवून यावर्षीच्या पूरनियंत्रण व्यवस्थापनाचे नियोजन करावे यासाठी सर्व अधिका-यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका , पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त पूरनियंत्रण आराखडा नियोजन बैठक आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी त्यांनी आदेश दिले .
या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , उल्हास जगताप , शहर अभियंता राजन पाटील , मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे , मुख्यलेखापरिक्षक आमोद कुंभोजकर , नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे , यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ . राजेंद्र वाबळे , सहशहर अभियंता रामदास तांबे , मकरंद निकम , प्रवीण लडकत , श्रीकांत सवणे , अशोक भालकर यासह उपआयुक्त , सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . लक्ष्मण गोफणे , क्षेत्रीय अधिकारी , शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे , कार्यकारी अभियंता , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे डिविजनल इंजिनीअर राहुल गवारे , वायफळकर सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील आदी उपस्थित होते .
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे सन २०२१ च्या पूरनियंत्रण आराखड्याची माहिती दिली . नदीलगतची पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा असे नमूद करून आयुक्त राजेश पाटील म्हणाले , पावसाळयात वादळी वा – यासह झाडे उन्मळून पडुन मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक वृक्षाची छाटणी करून घ्यावी . महानगरपालिकेच्या हद्यीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती नियंत्रण कक्षास देणे , नदीपात्रालगत पात्रातील झोपडपटटया व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करुन योजना ठरविणे व नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे , नदी पात्रातील गाळ तसेच जलपर्णी काढणे , तसेच धोकादायक जागांचे सर्वेक्षण करणे , गटार सफाई करणे व औषधी फवारणी करणे , पालिकेच्या हद्यीतील सर्व जुन्या इमारतीचे वाडयाचे बांधकाम तपासणी ( Structural Audit ) आदी कामे पावसाळ्यापूर्वी करुन घेण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Comments are closed