मुंबई, दि. ११(punetoday9news):- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.
नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे समोर आले आहे . या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे.
या आजारावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.
या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
Comments are closed