पुणे,दि.१४( punetoday9news):-  ऑक्सिजनचे 27 तर व्हेंटिलेटरचे तीन बेड महापालिकेकडे उपलब्ध असल्याचा दावा महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला . या दाव्याची खातरजमा करण्यासाठी हेल्पलाईनला फोन केला असता हेल्पलाईनसाठी काम करणाऱ्या महिलेने बेड उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे पुणे महापालिकेच्या कारभाराची पोलखोल झाली . त्यानंतर हेल्पलाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण टीमला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्याचबरोबर उच्च न्यायालयातून फोन करण्यात आल्यानंतर समाधानकारक उत्तरे का देण्यात आली नाहीत यासाठी त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे .

हेल्पलाईनवर काम करणारे कर्मचारी हे शिक्षक होते त्यामुळे ते व्यवस्थित उत्तरे देऊ शकले नाहीत , असे कारण महापालिकेकडून देण्यात आले . मात्र हेल्पलाईनसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेड न मिळण्याचे खापर फोडून वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी सुरक्षित  राहण्याचा प्रयत्न करतायत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .

पुण्यात कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली . या याचिकेवर सुनावणी सुरू असताना पुण्यात कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळतायत आणि आत्ताच्या घडीला ऑक्सिजनचे 27 तर व्हेंटिलेटरचे तीन बेड महापालिकेकडे उपलब्ध असल्याचा दावा महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला . या दाव्याची खातरजमा करण्यासाठी न्यायाधीशांनी लगेच याचिकाकर्त्यांच्या वकिलांनाच पुणे महापालिकेच्या हेल्पलाईनला फोन करुन बेड बाबत विचारणा करण्यास सांगितले असता न्यायाधीशांसमोरून लावलेल्या या फोनला हेल्पलाईनसाठी काम करणाऱ्या महिलेने बेड उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले . त्यामुळे न्यायालयात उपलब्ध असलेले सगळेजण चकित झाले .

त्यानंतर न्यायाधीशांनी पुणे महापालिकेच्या वकिलांनाच या हेल्पलाइनवर फोन करण्यास आणि बेड उपलब्ध आहे की नाही हे विचारण्यास सांगितलं . महापालिकेच्या वकिलांनी देखील त्या हेल्पलाईनवर फोन केला . मात्र त्यांनाही बेड उपलब्ध नसल्याचे पलीकडून सांगण्यात आले . न्यायालयाच्या समोरच घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महापालिकेच्या दाव्याची पोलखोल झाली . त्यानंतर न्यायालयाने पुणे महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले आणि सर्वसामान्यांना तात्काळ बेड उपलब्ध होतील , अशी सुविधा निर्माण करण्याची सूचनाही केली .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!