संपादकीय – सागर झगडे. 

 

( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील चममकोगिरी करणाऱ्या स्वयंघोषीत योद्ध्यांना आवर कुणी घालायचा असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू लागलाय. मदतीच्या नावाखाली फोटोसेशन अगदी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवून चालू आहे.  एकीकडे कोरोनाचा कहर चालूच असून कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत असताना या महाशयांमध्ये मी किती मोठा दिलदार आहे हे दाखवण्याची चढाओढ चालू आहे. 

जगाला सोशल डिस्टन्सिंगचे धडे देताना ह्या महाशयांची तोंडे मात्र आ वासून उघडी असणार आणि मास्क लावण्याचे किती फायदे आहेत हे फ्लेक्स, सोशल मिडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार.  यातून थोडीफार प्रसिद्धी मिळतही असेल पण आपल्या या समाजविघातक कृत्याचे अनुकरण इतर नागरिक करत असतात हे विसरता कामा नये. स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी, विरोधक व जनतेला आवाहन करून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही त्या आदेशास केराची टोपली दाखवण्याच्या जणू चंगच यांनी बांधला आहे.  

आपणांस खरोखरच मदतकार्य करायचे आहे तर त्यासाठी फोटोसेशनची आवश्यकता आहे का? एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हातालाही समजू नये अशी शिकवण महापुरूषांनी आपल्या समाजास दिली मग याच महापुरूषांची नावे घेवून त्यांच्या विचारसरणीच्या विरूध्द कार्य करणे कितपत योग्य आहे. हे वर्तन म्हणजे असं झालं की जगा सांगी ब्रम्हज्ञान अन स्वतः कोरडे पाषाण.

आणि हो, यात फक्त सामाजिक, राजकीय कार्यकर्ते पुढे आहेत असे नाही तर प्रशासनात कार्य करणारे नोकरदार वर्ग ही ऑनड्युटी प्रशासनाचे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवताना दिसतात त्यामुळे आता मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देवूनही चममकोगिरी करणाऱ्यांची मर्कटलीला कधी थांबणार असा उद्विग्न सवाल करण्यापलिकडे सामान्य नागरिकांच्या हातात काहीच उरले नसल्याची सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागीय आयुक्तांपासून सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्या नंतरही इतर जबाबदार अधिकारी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे कधी पाळणार.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर जिल्हाधिकारी कार्यालयातील भर कार्यक्रमात अधिकाऱ्यास मास्क लावण्याचे सांगत खडसावले होते. मग इतर राजकीय नेत्यांना हे नियम कोण समजाणार ? वाढदिवस, लग्न समारंभ, विविध दिनाचे औचित्य साधून हेच स्वयंघोषीत योद्धे बंदी असतानाही सर्रासपणे नियमांची पायमल्ली करत कार्यक्रम घेत आहेत यांच्यावर पोलिस प्रशासनाने तरी किती लक्ष द्यावे.  शेवटी त्यांनाही अघोषित मर्यादा आहेच.  आता वेळ आहे ती स्वयंस्फूर्तीने नियम पाळण्याची व फोटोसेशन पेक्षा प्रामाणिकपणे मदतकार्य करण्याची. शेवटी उत्तम कार्याचे फळ जनता मतदानातून देणारच आहे आणि राहिला प्रश्न तो चमकण्याचा तो कार्यरूपी प्रकाश समाजात आपोआप नागरिक व विश्वासार्ह मिडिया निर्माण करेलच यात शंका नाही.

सातत्याने कॅलेंडरमध्ये असणारी तिथी, दिन पाहून कोरोना मदतीच्या नावाखाली कोरोनाचा प्रसार जोरात चालू आहे. कारण अशा कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांपैकी काहींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येत आहे. 

त्यामुळे आता सद्सद्विवेक बुद्धीने आपल्या जनतेची सेवा करण्याची वृती ठेवून नियमांचे पालन करत कोरोना चा प्रसार कसा होणार नाही याचे भान ठेवून कार्य करायला हवे.  आपल्या कार्यक्रमात आपण केलेल्या मदतीवेळी कोरोनाचा प्रसार झाल्यास हजार रूपयांच्या मदतीची परतफेड त्या कुटुंबास लाखो रुपये हाॅस्पिटलमध्ये भरून करण्याची वेळ येवू नये. आणि फोटोसेशन साठी केलेला फोटो शेवटचा फोटो ठरू नये.  

 

 

Comments are closed

error: Content is protected !!