रत्नागिरी,दि.16(punetoday9news):-   दि. 16 ते 17 मे 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत हवामान अंदाज खात्याने इशारा दिला आहे. सदर कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची व वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्हा अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी लगत असल्याने रत्नागिरी जिल्ह्याला “तोक्ते” चक्रीवादळाचा तीव्र तडाखा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली व मंडणगड या पाच तालुक्यांना याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या वादळामुळे कच्ची घरे, पत्र्याची घरे, गुरांचे गोठे यांची पडझड होऊन जीवितहानी होऊ नये, व जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना म्हणून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांची “तोक्ते” चक्रीवादळामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून दिनांक 16 ते 17 मे 2021 या कालावधीत कोणत्याही ईसमास त्यांच्या अत्यावश्यक सेवाविषयक बाबींसाठी (उदा.वैद्यकीय) वगळून अन्य कोणत्याही गोष्टींसाठी घराबाहेर पडण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध लागू करीत आहे. पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या कालावधीत त्या-त्या तालुक्यातील लोकांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित रहावयाचे आहे.

सदरचा आदेश रत्नागिरी जिल्ह्याच्या तालुकाक्षेत्रासाठी त्या-त्या दिवशी लागू राहील.

राजापूर, रत्नागिरी तालुक्यात दिनांक 16/05/2021 (रविवार) रोजीच्या सकाळी 06.00 वाजेपासून दिनांक 17/05/2021 (सोमवार) रोजीच्या सकाळी 06.00 वाजेपर्यंत

गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यात दिनांक 16/05/2021 (रविवार) रोजीच्या सायंकाळी 06.00 वाजेपासून दिनांक 17/05/2021 (सोमवार) रोजीच्या रात्री 11.00 वाजेपर्यंत

तथापि, नैसर्गिक आपत्ती काळात आवश्यकत्या उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा यांना सदर आदेश लागू राहणार नाहीत.

सदर कालावधीत ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खालीलप्रमाणे काळजी घ्यावी

1) मच्छीमार आणि अन्य लोकांनी समुद्रात जाऊ नये. मच्छीमारांनी आपआपल्या बोटीचे नुकसान होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवाव्यात.

2) घरात पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातून बाहेर जाऊ नये.

3) घर सुरक्षित नसेल तर साधन सामुग्री घेऊन सुरक्षित निवाऱ्यांच्या ठिकाणी जावे.

4) पशुधन आणि अन्य पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.

5) आपल्या जवळ स्टोव्ह, काडेपेटी, खाद्यपदार्थ, मेणबत्त्या, केरोसीन इत्यादी वस्तू आणि बातम्या ऐकण्यासाठी रेडीओ ठेवावा.

6) अन्नधान्य, पाणी, औषधे सोबत ठेवावी.

7) पाणी उकळून प्यावे.

8) समुद्रकिनाऱ्यावरील लोकांनी सावधगिरी बाळगावी.

9) ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार उपाययोजना कराव्यात.

10) Home Quarantine नागरीक आणि इतर लोकं एकत्र मिसळणार नाही यांची काळजी घ्यावी.

11) आपल्या जीवितास प्राधान्य द्यावे.

12) मदतीसाठी फोन नंबर – 02352-226248, 2222333, 7057222233.

 

Comments are closed

error: Content is protected !!