महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून दररोज सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत तज्ञ योगशिक्षकांतर्फे योग प्रशिक्षण देण्यात येणार.

 

पिंपरी,दि. १७( punetoday9news):- कोविडची सौम्य लक्षणे असणारे रुग्ण तसेच गृह विलगीकरण केलेल्या रुग्ण आणि नागरिकांसाठी मनोबल वाढविणे व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज योगप्रशिक्षण घेण्यात येणार आहे . नागरिकांनी महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे .

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने Covid – 19 रुग्णांसाठी सुरु करण्यात येणा-या निशुल्क ऑनलाईन योग प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रमाचे उदघाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले , त्यावेळी त्या बोलत होत्या . या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , नगरसदस्या आरती चौंधे , निर्मला कुटे , पतंजली योगपीठ , हरिद्वार येथून ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय मुख्य प्रभारी डॉ . जयदीप जी आर्य , महाराष्ट्र प्रभारी बापू पाडळकर , जिल्हा अध्यक्ष मिलिंद वालझाडे , संघटन मंत्री डॉ . नारायण हुले , भोसरी विभागप्रमुख सुरेश साळुखे आदी उपस्थित होते .

योगासनांमुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते तसेच प्राणायामामुळे ऑक्सिजन क्षमता वाढते . त्यातून रुग्णाला उर्जा मिळून तो लवकर बरा होतो असे डॉ.जयदीप जी आर्य म्हणाले . तणाव मुक्तीसाठी देखील योगसाधना महत्वाची ठरते असे नमूद करून ते म्हणाले , शहरातील गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना बाधितांना योग मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे योगप्रशिक्षक सहकार्य करतील . कोरोना रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी योगासन महत्वाचे असून त्यासाठी महानगरपालिका पतंजली योगपीठा समवेत हा उपक्रम सुरु करीत आहे . त्यानुसार महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून दररोज सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत तज्ञ योगशिक्षकांतर्फे योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे , असे महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या .

पतंजली योगपीठाचे स्वामी रामदेव महाराज यांनी योगाभ्यासाचा प्रोटोकॉल तयार करुन टेली – मेडिसिन या योजनेअंतर्गत रुग्णांचे मनोबल वाढविणे व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग व आयुर्वेदाचा उपयोग कसा करावा यावर मार्गदर्शन केले आहे असे बापू पाडळकर यांनी सांगतिले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!