नवी मुंबई, दि. 18( punetoday9news):- बारामती ॲग्रो या संस्थेने कोकण विभागासाठी 24 ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर देऊन जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी प्रशासनाला मदतीचा हात दिला. बारामती ॲग्रो संस्थेने हे 24 ऑक्सिजन कॉन्सेंन्ट्रेटर आज कोकण विभागाचे महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हाती सुपूर्द केले.
राज्यासह देशभरामध्ये सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावा, यासाठी सध्या ऑक्सिजन कॉन्सेंन्ट्रेटर संजीवनी ठरत आहे. परंतु या उपकरणांची उपलब्धता ही मर्यादित असल्यामुळे, तसेच ही उपकरणे महागडी असल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन कॉन्सेंन्ट्रेटर खरेदी करणे शक्य होत नाही. राज्यात ऑक्सिजन, औषधे, उपकरणांचा तुटवडा होऊ नये यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासनावर अतिरिक्त ताण पडत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री. रोहित पवार यांची बारामती ॲग्रो ही संस्था मदतीचा हात घेऊन पुढे आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये एकूण 500 ऑक्सिजन कॉन्सेंन्ट्रेटर वाटप करण्याचे लक्ष या संस्थेने ठेवले असून, आजपासून या शुभकार्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. कोकण विभागासाठी 1 लिटर चे 7 आणि 10 लिटरचे (प्रती मिनीट क्षमतेचे) 17 असे एकूण 24 ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर देण्यात आले आहेत.
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयांतील ग्रामीण भागात ऑक्सिजन तुटवडा होऊ नये. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून, तसेच या ठिकाणी असलेल्या कोरोना काळजी केंद्रांमध्ये अचानकपणे गंभीर होणाऱ्या किंवा प्राणवायूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार पुरवण्याच्या दृष्टीने या ऑक्सिजन कॉन्सेंन्ट्रेटरचा संजिवनी म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. बारामती ॲग्रो संस्थेने प्रशासनाला केलेल्या या सहकार्याबद्दल कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संस्थेचे प्रमुख आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, प्रदेशाध्यक्ष नामदेव भगत, नवी मुंबई युवक अध्यक्ष राजेश भोर, युवक कार्याध्यक्ष सौरभ काळे, बेलापूर विधानसभा कार्याध्यक्ष आकाश पाटील, बारामती ॲग्रो लि. चे प्रतिनिधी अजय दोंदे यांचे आभार मानले.
या प्रसंगी उप आयुक्त (सामान्य) मनोज रानडे, उप आयुक्त (पुरवठा) विवेक गायकवाड आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरक्षित अंतर ठेवून सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम पार पडला.
कोरोना संकटामध्ये अशा पद्धतीने माणुसकीच्या भावनेतून पुढे येणाऱ्या अशा सर्व सामाजिक संस्थांचे कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मन:पूर्वक आभार मानले असून इतरांनीही जमेल त्या मार्गाने प्रशासनाला मदत करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहनही केले.
Comments are closed