तीर्थक्षेत्र देहू-आळंदी : मदतीचे आवाहन
वाकड,दि.१९( punetoday9news):- सांप्रदायिक व अध्यात्मिक शिक्षण साधनेसाठी तीर्थक्षेत्र देहू-आळंदीतील धर्मशाळेत राहून, माधूकरीवर (भिक्षा) गुजराण करणाऱ्या हजारो शिष्यांची कोरोनामुळे उपासमार सुरू आहे. त्यामुळे जे तुमच्या ज्ञानाची भूक भागवितात त्यांच्या पोटाची भूक भागवा असे भावनिक आवाहन सांप्रदायिक क्षेत्रातून करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र देहू-आळंदीत हजारो विद्यार्थी वारकरी सांप्रदायाची साधना-उपासणा व विद्यार्जन करतात. सांप्रदायाचा प्रचार-प्रसार करून उच्च मानवी मूल्यांचा कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, मृदंगवादन, भजनाद्वारे समाजात जागर करतात. मात्र लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून पंचक्रोशीतील गावांत माधुकरीसाठी जाता येत नाही, इच्छा असूनही लोक माधुकरी देण्यास धजावत नाहीत. भाजीची केटली-भिक्षेची झोळी मोकळीच राहते. उपजीविका भागविणे जिकिरीचे बनले आहे. केवळ वस्तू स्वरूपातच मदत शिक्षण संस्थांकडे सुपूर्त करावी अशी विनंती करण्यात आली.
अनेक गावांतील मोठा वर्ग आर्थिक अडचणीत सापडला. त्यांनी रोजगारचे उदरनिर्वाहाचे कामचलाऊ साधन शोधत स्थलांतर केले. त्यामुळे माधुकरीला देखील मर्यादा आल्या. अन्नाअभावी आमच्या साधनेत बाधा येऊ नये, मायबाप जनतेने विचार करून साधनेत खंड पडू देऊ नये अशी आर्त विनवणी अनेक साधकांनी केली आहे.
वेदकाळात गुरुकुल पद्धत होती, ज्ञान साधनेसाठी घर सोडून शिष्य गुरूंच्या आश्रमात जात, शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिथेच राहत. ही संकल्पना आळंदीत १९१७ सद्गगुरू जोग महाराज यांनी ही संकल्पना रुजवली. त्यांच्या चार शिष्यांनी पूढे कार्य चालविले. या ४ वर्षांच्या शिक्षणासाठी कुठले डोनेशन, ना कुठली फी आहे ना शिक्षकांना पगार. सर्व काही मोफत. सर्वच वयोगटातील चांगल्या घरातील ही साधक. आई-वडील, घरदार, उत्तम सुख सुविधा सोडून चक्क धर्मशाळेत राहतात, भिक्षेवर जगात ते केवळ अध्यात्मिक शिक्षण ग्रहण करण्यासाठी. हीच प्रथा शेकडो वर्षांपासुन अविरत सुरू आहे.
महाराष्ट्रातील जनतेला प्रवचन कीर्तन सेवा देणारे सर्व महाराज देहू-आळंदीतीलच शिक्षण संस्थेतच घडले याच शिक्षणाच्या जोरावरच ते खंबीरपणे उभे राहिले त्यांना प्रसिद्धी मिळाली. मान, सन्मान, वैभव प्राप्त झाले आशा सर्वांनी नैतिक जबाबदारी व कर्तव्य म्हनून साधक बंधूंना मदतीचा हात द्यावाअशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सांप्रदाय भविष्यातील थोर विचारवंताला मुकेल – हभप. ॲड शंकरमहाराज शेवाळे , अ. भा. वा. मंडळ केंद्रीय समिती सदस्य
ज्ञानाची भूक भागविनाऱ्यांच्या पोटाची भूक भागविली पाहिजे. दीड वर्ष सप्ताह बंद आहेत. आपले घर सोडून गावोगावी जाऊन गायन, वादन, कीर्तन, प्रवचनातून नीती, सदाचार, ज्ञानसंपन्न जीवनाचे धडे देणारे ज्ञानोबा तुकोबांची असंख्य लेकरे झुंजत आहेत सर्वांनी माणुसकीचा हात देऊन त्यांची वणवण थांबवावी अन्यथा वारकरी सांप्रदाय भविष्यातील थोर विचारवंताला मुकेल.
सांप्रदायिक उत्तरदायित्व म्हणून सहकार्य करावे – हभप. चंद्रकांतमहाराज वांजळे
कोरोनामुळे अनेक गावातील धर्मानुरागी भागवत धर्मप्रेमी माधुकरीच्या रूपाने शंभर वर्षांपासून सेवा करत आहेत. सांप्रत काळात ईच्छा असूनही त्यांना ही सेवा करता येत नाही. त्यामुळे वारकरी साधक वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. तरी समाजातील सर्वच मंडळींनी सहानुभूती आणि सामाजिक, सांप्रदायिक उत्तरदायित्व म्हणून सहकार्य करावे.
समाजाने जबाबदारी स्वीकारावी – हभप. सतीश महाराज काळजे
या कोरोनाच्या महामारीत आपण नातेवाईकांच्या सुद्धा घरी जाऊ शकत नाही त्यामुळे हे विद्यार्थी मधुकरीसाठी कसे जातील याचा विचार करून ही महामारी संपेपर्यंत समाजाने जबाबादरी स्वीकारावी.
Comments are closed