• कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सादर करा.

पुणे, दि.२४( punetoday9news):-  पुणे जिल्ह्यात कोविड-१९ आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या आणि कोविडमुळे दोन्ही पालक उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यात कोव्हीड १९ मुळे दगावलेल्या पालकांच्या ४ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि संरक्षणासाठी महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले असून या बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.

बाल संरक्षक कृती दला मार्फत काम सुरु – कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी राज्यात जिल्हास्तरीय बाल संरक्षक कृती दल गठीत करण्यात आले आहेत. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम या टास्क फोर्सच्या माध्यमातून होत आहे.

बाल संगोपन योजनेचा लाभ– दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना तसेच कोविड मुळे दोन्ही पालक वैद्यकीय उपचार घेत असलेल्या बालकांना काळजी आणि संरक्षणासाठी बाल कल्याण समितीमार्फत योग्य निर्णय घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांचे आर्थिक, मालमत्ता विषयक व कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या बालकांना आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ द्या. या बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करा. तसेच आवश्यकता असल्यास दत्तक प्रक्रियेची मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

माहिती सादर करण्यासाठी हेल्पलाईन सुरु– कोविड १९ मुळे पिडीत संगोपनाचा प्रश्न निर्माण झालेल्या बालकांची माहिती जिल्हा प्रशासनास मिळण्यासाठी जिल्हास्तरावर बालकांसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये चाईल्ड हेल्प लाईन १०९८ ही २४ तास सुरु असून ८३०८९९२२२२, ७४०००१५५१८ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहतील. या हेल्पलाईन बाबतची माहिती सर्व रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
बालकांचे शोषण होवू नये, यासाठी दक्षता– कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेली बालके बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणार नाहीत, अशा बालकांचे शोषण होणार नाही, त्यांची ‘बालकामगार’ म्हणून आस्थापनेवर नेमणूक होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागामार्फत घेण्यात येत आहे. बालकांबाबत गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभागाच्यावतीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.
बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ नुसार दत्तक प्रकिया- कोरोना मुले दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने संबधित पालकांची मुले दत्तक द्यायची आहेत. अशा आशयाची माहिती समाज माध्यमावर फिरत आहे. याप्रकारे चुकीची माहिती समाज माध्यमावर देणे तसेच अशा पद्धतीने मूल दत्तक देणे कायद्याने गुन्हा आहे. अशा घटनांवर लक्ष ठेवून नियमावली नुसार आणि बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०१५ नुसार दत्तक प्रकिया करण्याबाबत जनजागृती करा, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सूचित केले आहे.
बालकांचे समुपदेशन सुरु– पुणे जिल्ह्यात कोविड १९ मुळे दगावलेल्या पालकांच्या ४ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि संरक्षणासाठी महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले आहे. या बालकांचे समुपदेशन करण्याचे काम सुरु असून त्यांच्या मालमत्तेबाबत लवकरच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी सांगितले.

संपर्कपुणे जिल्ह्यातील बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी २९/२ गुलमर्ग को. ऑप. हौसिंग सोसायटी, सोमवार पेठ, पुणे ४११०११ आणि अध्यक्ष, बाल कल्याण समिती क्रमांक १ व २ पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र परिसर, गोल्फ क्लब रोड येरवडा, पुणे ४११००६ येथे संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आवाहन केले आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!