• जमीनधारकांच्या अडी अडचणीचे समाधान करून रिंगरोडसाठी जमिनी मोजणीला गती द्या – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि. २४( punetoday9news) :- रिंगरोडसाठी जमिनी भूसंपादित होत असलेल्या २५ गावांमध्ये जाऊन जमिनधारकांच्या अडी-अडचणींचे समाधान करुन मोजणी प्रक्रीयेस गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणा-या रिंगरोड महामार्गाच्या बांधकामाच्या भूसंपादन प्रक्रिये अंतर्गत मोजणीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे, उपविभागीय अधिकारी मावळ, मुळशी, हवेली, दौंड-पुरंदर, भोर, खेड, संबंधित तालुक्यांचे उपअधिक्षक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व अभियंता, मोनार्चचे अधिकारी उपस्थित होते. तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुंबई हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
रिंगरोडने बाधीत होणा-या गावांमध्ये जाऊन महसूल प्रशासनाने जमिनधारकांच्या सर्व शंकाचे व अडीअडचणीचे निरसन केल्यामुळे मोजणीसाठी विरोध कमी होऊन आत्तापर्यंत ३७ गावांपैकी १२ गावातील १६० हेक्टर क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत मुळशी तालुक्यातील घोटावडे, मातेरेवाडी, अंबडवट, कासार-आंबोली, कातवडी (६ गावे), हवेली तालुक्यातील मालखेड, मांडवी बुद्रुक, वरदाडे, घेरा-सिंहगड, मोरदाडवाडी (५ गावे) व भोर तालुक्यातील मौजे- कुसगाव अशा एकूण १२ गावांची भूसंपादनाची मोजणी प्रक्रीया पूर्ण झाली आहे.
रिंगरोड (पूर्व) मार्गासाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर व भोर या ५ तालुक्यातील ४६ गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना दिनांक १९ मे २०२१ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करण्याच्या सूचना उपाध्यक्ष डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांना दिल्या.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!