पिंपरी,दि. २५(punetoday9news):- मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे चारवेळा भेट मागितली ; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मराठा समाज व छत्रपती संभाजीराजे यांची माफी मागावी ; अन्यथा छावा मराठा संघटनेमार्फत राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.
यासंदर्भात छावा मराठा संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मराठा आरक्षणासाठी छावा मराठा संघटना दिल्ली स्तरावर लढा देत आहे. परंतु सर्वांनी एकत्र प्रयत्न केले, तरच मराठा आरक्षण मिळेल. त्या दृष्टीने खासदार छत्रपती संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी पत्र लिहिले होते. मात्र, खासदार संभाजीराजे यांच्या पत्रांना मोदींकडून उत्तर आले नाही. मराठा आरक्षण मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय 20 खासदारांच्या शिष्टमंडळाने नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. पण पंतप्रधान मोदींनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेली नाही. यावरून पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणप्रश्नी गंभीर नसल्याचे दिसते. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावावा, असे पत्र खासदार संभाजीराजे यांनी सर्वपक्षीय खासदारांना पाठवले होते. सर्व खासदारांनी एकजुटीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, असे संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार संभाजीराजे यांच्या पत्राला उत्तर न देता मराठा आरक्षण मुद्द्याला बगल दिली आहे. एकीकडे भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना भेट नाकारायची, हे बरोबर आहे का ? असा सवालही छावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत लवकरच मोठे आंदोलन छेडणार असल्याचेही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने सारथी संस्थेसंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले होते.
यासंदर्भात आक्षेप नोंदवत छावा मराठा संघटनेने जोरदार आंदोलन छेडले होते, असेही रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
Comments are closed