• भोसरी, पुणे येथील मानव विकास संशोधन केंद्राचा पुढाकार
पुणे,दि.२५( punetoday9news):- पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात पालावर वास्तव्य करून असलेल्या जवळपास ६०० कुटुंबाना मानव विकास संशोधन केंद्राच्या पुढाकाराने किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. वैदू ,जोशी,डवरी गोसावी, तिलमारी,नंदीवाले,बहुरूपी, कैकाडी, नट, मदारी,ढोलकीवाले,वडार,पारधी ह्या भटक्या विमुक्त समाजातील जवळपास २००० व्यक्ती अर्थात ६०० कुटुंबे पालावर वास्तव्य करून राहतात. त्यांच्या आजूबाजूला गोंड,आदिवासी, महार,मातंग समाजाची काही कुटुंबे हि भाड्याने वास्तव्य करून आहेत त्यानांही या कार्यात समाविष्ट करून घेण्यात आले.
अन्न,वस्त्र,निवारा ह्याकरीता एकूणच समाजावर अवलंबून असलेल्या ह्या समाजाकडे शासनाचे कुठलेही विशेष लक्ष नाही. लॉकडाऊन काळात कुठलीही पर्यायी सोय नाही. पालाचे भाडे थकलेले, पाणीही तीन रुपये किंवा पाच रुपये प्रति भांडे याप्रमाणे विकत घेवून वापरायचे अशा स्थितीत लोक येथे जगत आहेत. अशा गरजू कुटुंबाचा सर्व्हे मानव संशोधन विकास केंद्राद्वारे अध्यक्ष भालचंद्र सावंत व मार्गदर्शक प्रा. विनायक लष्कर यांच्या मार्गदर्शनात करून मदतीच्या वाटपाचे नियोजन करण्यात आले.
किराणा सामान उपलब्ध करून देण्याकामी ठाणे येथील अनुभूती संस्था व दीपा पवार, पुणे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते असीम तांबोळी, समाजसेवक डॉ. महावीर साबळे, समाजसेविका मयुरी ढवळे, दिल्ली येथून डॉ.आश्विनी जाधव, श्वेता गोस्वामी अंकित गुप्ता यांनी सहकार्य केले. आणखी काही कुटुंबाना मदत पोचविण्याचे नियोजन करण्यात येत असून याकामी सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांचे सहकार्य मिळणार असल्याची माहिती केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक दयानंद कनकदंडे यांनी दिली.
मानव विकास संशोधन केंद्राने सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही मित्रांनी आर्थिक मदत उभी केली त्यामुळे मदतकार्य संचालनात भरघोस मदत झाली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अन्नधान्य,खिचडी वाटप, किराणा वाटप ह्यासंबंधी एकुणात एकूण कामाचे नियोजन हरिश्चंद्र सावंत, विष्णू अंबड आणि मोहिनी कारंडे ह्यांच्या टीमने केले.
आगामी महिन्यात सदर पालांना ताडपत्री वितरण, किमान अर्थसहाय्य, आरोग्य शिबिराचे आयोजन व काही शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष भालचंद्र सावंत यांनी दिली. या कामाकरिता जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जनतेला केले आहे.
Comments are closed