• कोविड-१९ चाईल्ड बेड मॅनेजमेंट हेल्पलाईन क्रमांक ७७६८८००१११,

• महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांबाबत बील तक्रार हेल्पलाईन क्रमांक ७७६८८००२२२

• तसेच मी जबाबदार ॲप.

 

पिंपरी,दि.२७( punetoday9news):-  खासगी रुग्णालयाविषयी कोविड-१९ संदर्भातील रुग्णसेवा, बील, अथवा इतर कोणत्याही तक्रारी करण्यासाठी महापालिकेने समन्वय अधिका-यांची नेमणूक केली असून समन्वय अधिकारी, बील तक्रार हेल्पलाईन आणि चाईल्ड बेड मॅनेजमेंट हेल्पलाईन संपर्क क्रमांकांचे फलक महापालिकेने सर्व संबंधित रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावले असुन   नागरिकांनी आपल्या तक्रारी संदर्भात दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

          कोरोनाची लागण झाल्याने महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना उपचाराअंती डिसचार्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाने अवाजवी बील आकारल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.  शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाजवी दराने बिलाची आकारणी करणे बंधनकारक असतानाही रुग्णालयाकडून या नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत तक्रारीची खात्री करण्याकरिता वैद्यकीय बिलांचे पूर्व आणि अंतिम लेखापरिक्षण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने समिती नेमण्यात आली आहे.  या समितीचे कामकाज आणखी परिणामकारक करण्यासाठी रुग्णालय बेड व्यवस्थापक समितीचे प्रमुख तथा सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी प्रत्येक रुग्णालयाची जबाबदारी महापालिका उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्याकडे सोपविली आहे.

            खासगी रुग्णालयाकडून जादा बील आकारण्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची शहानिशा करुन आकारण्यात आलेल्या बीलामध्ये अनियमितता आढळून आल्यास योग्य बिल आकारण्याबाबत संबंधित रुग्णालयाला आदेशित करणे व त्याची एक प्रत संबंधित तक्रारदार नागरिकाला उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने समितीमार्फत केली जाणार आहे.

या कामकाजाकरिता नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंता तथा संबंधित अधिका-याचे नाव, पदनाम, मोबाईल क्रमांक  सर्व संबंधित हॉस्पीटलच्या दर्शनी भागावर फलकाद्वारे प्रसिध्द करण्यात आला आहे.  १३५ रुग्णालयांमध्ये असे फलक लावण्यात आले आहेत.  प्राप्त झालेल्या वैद्यकीय बिलांच्या तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीबाबतचा साप्ताहिक अहवाल महापालिका मुख्यलेखा परिक्षक यांच्यामार्फत आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येत आहे.

          प्रसिध्द करण्यात आलेल्या या फलकावर कोविड-१९ चाईल्ड बेड मॅनेजमेंट हेल्पलाईन क्रमांक ७७६८८००१११, महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांबाबत बील तक्रार हेल्पलाईन क्रमांक ७७६८८००२२२ तसेच मी जबाबदार ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन प्रसिध्द करण्यात आले आहे.  नागरिकांनी संबंधित हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!