निसर्ग अभ्यासक अनुज खरे साधणार संवाद.
पुणे,दि.२८(punetoday9news):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे अनेकजण घरी असले तरी, या सर्वांच्या वैचारीक समृध्दतेत कोणत्याही प्रकारची उणीव निर्माण होऊ नये, या दृष्टीकोनातून राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’ यांच्या माध्यमातून ऑनलाईन चर्चासत्रांचे आय़ोजन केले जात असून या उपक्रमाचे पाचवे सत्र शनिवार २९ मे रोजी पार पडणार आहे. पक्षी जगताची अनोखी सफर घडवून आणणा-या ‘नभांगणीचे मुशाफिर’ या विषयावर निसर्ग अभ्यासक अनुज खरे हे ऑनलाईन कार्यक्रमात संवाद साधणार आहेत.
खा. वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’तर्फे राबवण्यात येणा-या ऑनलाईन चर्चासत्रांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मंडळी वक्ते म्हणून लाभली आहेत. निरनिराळ्या विषयांवर या मान्यवर व्यक्तींनी चर्चात्मक संवाद साधला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील तरूणांचा या ऑनलाईन चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशाचप्रकारे ‘नभांगणीचे मुशाफिर’ या पक्षी जगताची ओळख करून देणा-या सत्रात निसर्ग अभ्यासक, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक अनुज खरे हे शनिवार २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईनद्वारे संवाद साधणार आहेत. विपणनशास्त्र व व्यवसाय शास्त्रात पदविका ते पक्षी अभ्यासक होण्यापर्यंतचा अनुज खरे यांचा प्रवास ऐकण्यासारखा आहे. आज निसर्ग क्षेत्रात काम करत असताना निसर्गाशी संबंधित विविध शासकीय व खासगी मंडळांच्या सदस्य समितीवर ते काम करत आहेत. पक्ष्यांचे वेगळे विश्व, पक्षी अभ्यासक म्हणून एक प्रवास, निसर्ग क्षेत्र यासारख्या विविध विषयांचे पैलू या चर्चासत्रात उलगडणार आहेत. खा. वंदना चव्हाण यांच्या अधिकृत फेसबूक पेजच्या माध्यमातून ‘नभांगणीचे मुशाफिर’ या चर्चासत्रामध्ये तुम्हालाही सहभागी होता येईल.
विविध विषयांवर मार्गदर्शन-
‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’तर्फे राबवण्यात येणा-या या ऑनलाईन चर्चासत्रात आजवर, ‘प्रतिती सेंटर फॉर मेंटल हेल्थ’च्या सुषुप्ती साठे यांनी ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. ‘पुणे शहरासमोरील आव्हाने’ आणि ‘पुणे शहरातील पाणीपुरवठा’ या दोन वेगळ्या विषयांवर ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक सुनील माळी यांनी संवाद साधला. तर काही दिवसांपूर्वीच ‘मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्ता कोहिनकर यांनी मार्गदर्शन केले. केवळ चर्चासत्रेच नव्हे तर पर्यावरणपूरक सायकल रॅली, तुकाई टेकडी येथे वृक्षारोपण, सामाजिक संदेश देणारे भित्तीचित्र सेल्फी यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.
Comments are closed