पिंपरी,दि.१( punetoday9news):- जेव्हा महिलांना घरातून बाहेर पडणे अशक्य होते, त्यावेळी अठराव्या शतकात राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. त्या कुशल प्रशासक, योध्या होत्या अहिल्याबाई होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करून खरा इतिहास लिहिला पाहिजे. महापुरुषांच्या इतिहासाला जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे चुकीचे आहे. नव्या लेखण्या सरसावताना त्या विवेकवादी व्हाव्यात, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.
राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रशासन व्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते.
श्रीपाल सबनीस म्हणाले, की अहिल्याबाई होळकर किंवा सर्वच महापुरुषांना एका विशिष्ट जातीत बंदिस्त करणे चुकीचे आहे. स्वराज्याची परंपरा पाहिली तर स्वराज्याला जात, धर्म नसल्याचे दिसून येते. ज्या जुन्या लेखकांनी जातीवादाचे विष पेरले, ती चूक नवीन लेखकांनी करू नये. सत्याच्या अटीत महापुरुषांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. अहिल्याबाई होळकर उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने त्यांना विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर यांना सरसेनापती करून अहिल्याबाई होळकर यांनी माळव्यास प्रयाण केले. राज्याची राजधानी ही नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती, पण इंदूूूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर केले, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी रस्ते व किल्ले बांधले.
सबनीस पुढे बोलताना म्हणाले, की अहिल्याबाई यांनी सती जाऊन एकट्याचे समाधान करण्यापेक्षा जनतेसाठी काम करून सर्वांचे समाधान केले, ही क्रांतिकारी गोष्ट होती. त्यापाठीमागे मल्हारराव होळकर यांची शिकवण होती. त्यांनी संस्कृती, कला, साहित्य, धर्मकारण, राजकारण, समाजकारण या सर्व बाबतीत कर्तृत्व सिद्ध केले. ब्राह्मणशाहीत स्त्रीला राज्यकारभार करण्याची मुभा नव्हती, पण त्यांनी स्वकर्तृत्वाने ती मिळवली. शेतीसोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन दिले. कारागिरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीही सुरू केली.
अहिल्याबाई होळकर यांनी राजकारणातील बारकावे, तत्व, व्यावहारीक नीती नियम व सूत्रे, देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले. त्यांनी भारतातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाजोपयोगी कामे केली. विधवेला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात केली. हुंडाबंदी, वृक्षतोड करण्याला तसेच जंगलतोडीला बंदी घालण्यासारखे मोठे निर्णय त्यांनी घेतले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्याबाई होळकर या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला, असेही श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.
Comments are closed