मुंबई, दि.१ ( punetoday9news):- ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या व्यथांशी समरस झालेला, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारा लढाऊ पत्रकार, कृतीशील संपादक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राधाकृष्ण नार्वेकर यांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिले. पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी वृत्तसमूहांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. दैनिक मुंबई सकाळशी मात्र त्यांचे वेगळे नाते होते. दैनिक मुंबई सकाळचे संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली. तीच त्यांची ओळख होती. मुंबईच्या आणि मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या हा त्यांचा अभ्यासाचा, जिव्हाळ्याचा विषय होता. निर्भीड, निष्पक्ष, स्वतंत्र पत्रकारितेचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पत्रकारांच्या अनेक पिढ्या आज विविध माध्यमातून आपले योगदान देत आहेत. राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन मराठी पत्रकारिता, मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचे मोठे नुकसान आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
Comments are closed