राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित व्याख्यानमाला
पिंपरी,दि.३( punetoday9news):- अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली बांधकामे, घाट, विहिरी पाहिल्या तर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट दर्जा लक्षात येतो. ही बांधकामे, घाट, विहिरी आजच्या अभियंत्यांना विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या आहेत, असे मत व्याख्याते निलेश वडीतके यांनी व्यक्त केले. 
           राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित व्याख्यानात ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुरोगामी इतिहास’ या विषयावर ते बोलत होते.
          निलेश वडीतके म्हणाले, की अहिल्याबाईंच्या कार्यकाळात पाण्याच्या नियोजनासाठी मोठे काम झाले. तलाव, विहिरी, घाट, नदीला योग्य प्रकारे बांध घालणे अशी अनेक कामे झाली. उत्तम रस्ते, भक्कम किल्ले, दर्जेदार आरोग्य सुविधांची निर्मिती तसेच कला-संस्कृतीच्या विकासाला चालना देणे अशी कामेही अहिल्याबाईंच्या कार्यकाळात वेगाने झाली. भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा यांचेही मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले, हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अहिल्याबाईंमध्ये लहानपणापासूनच धीटपणा होता. निर्णय घेण्याची क्षमता होती. युद्धनीती, भालाफेक, घोडेसवारीमध्ये मल्हारराव होळकर यांनी त्यांना पारंगत केले होते. अहिल्याबाईंनी युद्ध कमी केली, पण जी युद्धे केली, ती बुद्धी कौशल्याच्या जोरावर जिंकली. युद्ध टाळण्याकडे त्यांचा कल होता. शाहिरी, पोवाडा अशा लोककलांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन करण्यावर भर दिला.
          प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करण्याकडे त्यांचा कल होता. पुरोगामी सहिष्णू धोरण त्यांनी अवलंबल्याचे दिसून येते. विधवेला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला. मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात केली. हुंडा बंदी, विनाकारण वृक्षतोड करण्याला, तसेच जंगलतोडीला बंदी घालण्यासारखे मोठे निर्णय घेतले आणि अंमलात आणले. संपूर्ण प्रांतात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. यामुळे अहिल्याबाईंविषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. त्यामुळे अहिल्याबाईंच्या विचारांचा अभ्यास युवा वर्गाने करण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणे काळाची गरज आहे. अनेक इतिहासकारांनी त्यांच्या विचारांचा आदर केल्याचे दिसते, असेेे त्यांनी सांगितले.

Comments are closed

error: Content is protected !!