पुणे दि. 4( punetoday9news):- शेती, उद्योग, माहिती तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रातील नेत्रदिपक कामगिरीने पुणे जिल्ह्याने देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनेक योजनांची आदर्श अंमलबजावणी केल्यामुळे पुणे जिल्ह्याचा देशपातळीवरही गौरव करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ २ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात आले असून या अभियानातही जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली आहे. ५ जून २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणा-या ऑनलाईन सन्मान सोहळयात पुणे जिल्हयाचा गौरव करण्यात येणार आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ २ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रामध्ये राबविण्यात आले असून सदर अभियानात सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार पुणे जिल्ह्याला जाहीर करण्यात आला आहे.

शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान
राज्य शासनाच्या 14 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायू तत्त्वांचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. जल तत्त्वांशी संबंधित नदी संवर्धन, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच अग्नी तत्त्वांशी संबंधित उर्जेचा परिणामकारक वापर, उर्जा बचत तसेच उर्जेचा अपव्यय टाळणे याबाबींना प्रोत्साहन , अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीचे बांध यासारख्या जागांवर राबविणे आणि आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमाणसांत बिंबविणे या प्रमुख बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी गुण ठेवण्यात आले आहेत.
पंचतत्त्वांतर्गत विभागणीने गुणांकन
पृथ्वी,हरित आच्छादन आणि जैवविविधता,घनकचरा व्यवस्थापन,वायू, पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांमार्फत परीक्षण करण्यात आलेली वायू गुणवत्ता,धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने जागेचे हरितीकरण,नागरी भागात नॉन मोटराइड वाहतुकीस प्रोत्साहन (नागरी),वायू,जल, जलसंवर्धन,रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता,सांडपाणी, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया,
अग्नी,नुतनीकरणयोग्य स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन,एकूण सौरऊर्जेवर चालणारे/ एलईडी चालणारे दिवे, हरित इमारतींची संख्या,विद्युत वाहनांना प्रोत्साहन – चार्जिंग पॉईंट उपलब्ध
आकाश,पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती, निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांनी घेतलेली शपथ,आकाश अशी विभागणी करून गुणांकन करण्यात येते. 1500 गुणापैकी गुण देण्याची पद्धती आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारातून अभियाला गती

‘माझी वसुंधरा अभियान’योजना नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासनाने या अभियानाला गती दिली. जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायती यांची प्रत्यक्ष व ऑनलाईन आढावा बैठक वेळोवेळी घेण्यात आली. सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायती यांनी आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व शुक्रवारी या दिवशी सकाळी ६ ते ८ या कालावधीत नगरपरिषद क्षेत्रात सदर अभियान राबविण्याबाबत प्रत्यक्ष भेटी देत व त्याचे फोटो अपलोड करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाहणीकरून वेळोवेळी मार्गदर्शन केले. कोरोना संसर्ग उपाययोजनेची प्रभावी अंबलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी तालुकास्तरीय पाहणीदौरा करतेवेळी नगरपालिका क्षेत्रात या योजनेची अंबलबजावणी कशा प्रकारे केली जाते याबाबत प्रत्यक्ष आढावा घेतला. शिरूर व इंदापूर येथे वृक्ष लागवड मोहीम व आळंदी येथे इंद्रायणी नदी सफाई या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे दर सोमवारी आयोजित शाखाधिकारी यांचे बैठकीत माझी वसुंधरा येजानेचे सादरीकरणातून आढावा घेण्यात आला. सर्व विभाग प्रमुखांना सदर योजनेची अंबलबजावणी करणेबाबत व हरित कायदाचे पालन करण्याची शपथ देण्यात आली . सर्व नगरपालिकांनी केलेल्या कारवाईचे मासिक अहवाल व छायाचित्रे दरमहा विहित मुदतीत शासनास सादर केले जातील याची दक्षता घेतली. घनकचरा व्यवस्थापन, विद्युत दिवे, हरित पट्टा व इतर आवश्यक कामांसाठी नगरपरिषदेणे सादर केलेल्या प्रस्तावास निधी उपलब्ध करून देण्यात आला.

नगरपरिषद स्तरावर ४० हजार वृक्ष लागवड, २२ हरित पट्टे विकसित

पुणे जिल्ह्यात बारामती, लोणावळा, तळेगाव दाभाडे, दौंड, चाकण, जुन्नर, आळंदी, शिरूर, सासवड, जेजुरी, भोर, इंदापूर, राजगुरुनगर या १३ नगरपरिषदा व वडगाव मावळ नगरपंचायत अशा एकूण १४ नागरी स्थानिक संस्थांनी माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेतला होता. अभियान कालावधीत एकूण ४० हजार वृक्ष लागवड करण्यात आली त्यापैकी ८० टक्के झाडे ही देशी प्रजातीची होती. एकूण २२ हरित पट्टे विकसित करण्यात आले. ११ ठिकाणी विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक नगरपालिकेत सायकल दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या दिवशी प्रदूषण करणारी वाहने न वापरता सायकल व पायी चालण्याला प्राधान्य देण्यात आले. शहरात जवळपास ५० पेक्षा जास्त सायकल मोहीम काढण्यात आल्या. लोणावळा येथे अभिनेते सुनील शेट्टी व अभिनेत्री आयेशा झुल्का तर वडगाव येथे अभिनेत्री सायली संजीव यांनी उपस्थित राहून पर्यावरण जागृतीसाठी संदेश दिले. नगरपरिषद क्षेत्रात रांगोळी स्पर्धा, टेरेस गार्डन स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच पथनाट्य, घंटागाडीवरील जिंगल्स, सोशल मिडिया होर्डिंग, भिंतीचीत्रे याद्वारे अभियानाची व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात आली. नगरपालिका क्षेत्रात नदी, तलाव, तळे, नाले यांची स्वछता करण्यात आली. नगरपालिका क्षेत्रात एकूण ६० हजार नागरिकांना वैयक्तिकरित्या व २२ हजार सामुहिकरित्या हरित कायद्याचे पालन करण्याबाबत शपथ देण्यात आली. शहरात अपारंपरिक उर्जा प्रकल्प व सोलर एलइडी लाईट बसविण्यात आली. शहराची प्रदूषण पातळी दरमहा तपासण्यात आली.
याबाबत सर्व नगरपालिकांचे शासनाचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात आले होते याबाबत बारामती, लोणावळ, सासवड, वडगाव मावळ नगरपरिषदा अंतिम फेरीत पात्र ठरविण्यात आल्या आहेत.
माझी वसुंधरा अभियानात लोणावळा नगरपरिषदेने ऑक्सीजन जंक्शन, कचरा वर्गीकरण, हवा प्रदुर्षण तपासणी, तलाव संवर्धन सौर ऊर्जा निर्मिती, इलेट्रिकल चार्जिंग पाँईंट तसेच वृक्ष संगोपन दिंडी असे अभिनव उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून लागले आहे.
सोमनाथ जाधव,मुख्याधिकारी लोणावळा नगरपरिषद
—-
माझी वसुंधरा अभियानात सासवड नगरपरिषदेने देशी जातीचे वृक्षारोपन केले आहे. सासवड शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग, हवा गुणवत्ता तपासणी, पाणीपुरवठयासाठी सौर ऊर्जेचा वापर तसेच जनजागृतीसाठी 10 हजार नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली आहे.
 विनोद झलक, मुख्याधिकारी सासवड

जेजुरी नगरपरिषदे अंतर्गत माझी वसुंधरा अभियानात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जिवंत राहावेत,यासाठी पाण्याचे पुनर्भरण करण्यात आले आहे. वृषारोपन तसेच सायकल फेरीचे आयोजनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
 पुनम कदम, मुख्याधिकारी जेजुरी

बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून 12 हजार 300 वृक्षलागवड करण्यात आली. वायू तत्वांतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण नऊ ठिकाणच्या हवेच्या नमुन्यांचे परिक्षण करण्यात आले. शहरांमधील विविध रस्त्यांच्या दुतर्फा हरितीकरण करण्यात आले आहे. जल तत्वांतर्गत 355 दशलक्ष लिटर आणि 128 दशलक्ष लिटर असे दोन साठवण तलाव कार्यरत असून 165 दशलक्ष लिटर क्षमतेच्या तिसऱ्या साठवण तलावाचे काम प्रगतिपथावर आहे. याचसोबत शहरामध्ये 11.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सध्या कार्यरत असून प्रतिदिन 11 दशलक्ष लिटर एकत्रित क्षमतेचे 3 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहेत.
अग्नी या तत्वांतर्गत 60 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल नगरपरिषद कार्यालयावर स्थापित करण्यात आले आहेत.
 किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती

 

 

Comments are closed

error: Content is protected !!