नवी दिल्ली, दि. 6 ( punetoday9news):- छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल धोरण आजही देशाला दिशादर्शक असल्याचे, प्रतिपादन एयर मार्शल अजित भोसले यांनी केले.
मध्ययुगीन काळातील घडामोंडीचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांना कळून चुकले होते की, ज्यांचे समुद्रात अधिपत्य स्थापित राहील तेच जमीनवरदेखील राज्य करू शकतात. त्यामुळे महाराजांनी तत्त्कालीन परिस्थितीमध्ये नौदलाकडे विशेष लक्ष देऊन सामुद्रिक धोरण सशक्त केले. त्याचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव त्याकाळात पाहायला मिळाला. तसेच स्वतंत्र भारताचा नौदलाचा पाया हा शिवाजी महाराजांमुळेच अधिक सशक्तपणे रचला गेला असल्याचे एयर मार्शल भोसले यांनी यावेळी सांगितले.
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत एयर मार्शल अजित भोसले यांनी ‘शिवाजी महाराजांचे नौदल धोरण’ या विषयावर 44 वे पुष्प गुंफताना बोलत होते. महाराष्ट्र शासन शिव राज्याभिषेक दिन हा दिवस ‘शिव स्वराज्य दिन’ म्हणून साजरा करीत आहे, या दिनाचे औचित्य साधून हे व्याख्यान आयोजित केलेले आहे.
‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता…… राजते’ या शिवमुद्रेचे वाचन करून व्याख्यानाची सुरूवात एयर मार्शल भोसले यांनी केली. 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला होता. या घटनेला यावर्षी 347 वर्ष पूर्ण झाली आहेत.
नौदलाच्या पंरपरा जुन्या असल्याचा उल्लेख करत एयर मार्शल भोसले म्हणाले, मौर्य, गुप्त, चालुक्य, चोल, पल्लव काळात सशक्त नौदल होते. या राज्यकर्त्यांनी समुद्रमार्गे सांस्कृतिक आणि राजकीय मोहिमा राबविल्या. याचे पुरावे जावा, सुमात्रा, ब्रम्हदेश, इंडोनशिया, मलाया, थांडलँड आदी देशात दिसतात. प्राचीन काळातील भक्कम असलेली नौदल पंरपरा मध्ययुगीन काळात रसातळाला पोहोचली होती. त्याला अनेक कारणे होती. याचा फायदा युरोपीयन वसाहतवादांनी घेतला. वास्को- द-गामा यांच्या समुद्रमार्ग शोधानंतर इंग्रज, पोर्तुगीज, अन्यांनी ईस्ट इंडिया कंपन्या भारतात शक्तीच्या जोरावर स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.
मध्ययुगीन काळातील सुजाण राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतूनच नौदल उभे राहिले. असे सांगून एयर मार्शल भोसले म्हणाले, मराठा साम्राज्याला त्यामुळे वेगळी बळकटी मिळाली. 17 व्या शतकाच्या मध्यापर्यंत नौदलाविषयक मराठ्यांची ताकत कमी होती. पश्चिम घाट, कोकण किनारपट्टीवर सिद्दीची पकड होती. त्यांच्याकडे मजबूत बोटी होत्या. यासह इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांचेही सामारिक पकड मजबुत होती, असे एयर मार्शल भोसले यांनी सांगितले.
Comments are closed